कवी ग्रेस

कवी ग्रेस 




( १० मे १९३७ - २६ मार्च २०१२ ) 

अधुनिक मराठी कवी. पुर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे. ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी. तथापि त्यांच्या कवितेतील नवाई आणि उत्कट आत्मपरता भावात्म नादलयींच्या अंगाने बहरत गेली. त्या दृष्टीने मराठीतील भावकवितेच्या परंपरास्त्रोताशी तिचे जिवंत नाते असले, तरी तिची पृथगात्मकता वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. 



प्रस्थापित वृत्तांची चौकट अनेकदा स्वीकारूनही त्यांची कविता वृत्तांच्या आधीन झालेली दिसत नाही. त्यांच्या अशा कवितांतून भावबीजानेच वाढतावाढता वृत्ताचा आकार स्वाभाविकपणे  धारण केल्याचा प्रत्यय मिळत राहतो, तर त्यांच्या मुक्त रचनांतूनही विविध संदर्भसमृद्ध भावानुभव आपापले घाट सहजपणे कोरीत जातात. इंद्रियसंवेदनांना रूप देणाऱ्या संपन्न प्रतिमासृष्टीमुळे त्यांची कविता पुष्कळदा सुंदर चित्रलिपीप्रमाणे भासते. अनेक संध्यारूपांतून आत्मरूपाचा शोध घेत जाणाऱ्या संध्याकाळच्या कविता आणि एका विशिष्ट अनुभवव्यूहाचे दर्शन घडविणाऱ्या राजपुत्र आणि डार्लिंगमधील कविता ह्या दृष्टीने लक्षवेधी ठरतात. 



शब्दांचे माध्यम अत्यंत परिणामकारकपणे वापरूनही त्यांच्या कवितांतून काही वेळा मौनसदृश, पण भावस्पर्शी  दुर्बोधता जाणवते. मृत्यू आणि एकटेपण ह्यांचे एक उदास भान आणि त्यांतून निर्माण होणारी करुणा हे त्यांच्या कवितेच्या मूलाशयाचे महत्त्वपूर्ण घटक होत. गद्य आणि काव्य ह्यांच्या सीमारेषेवर वावरणाऱ्या चर्चबेल  ह्या त्यांच्या ललितनिबंध संग्रहातही हा अनुभव येतो. ह्या भावकाव्यात्म निबंधांतून ग्रेस ह्यांच्या कवितांतील  अनेक व्यक्तिगत संदर्भ आणि बंदिस्त जागा मोकळ्या झाल्यासारख्या वाटतात ह्या निबंधांचे व त्यांच्या कवितांचे दुवे एकमेकांत मिसळून गेलेले आहेत.संध्याकाळच्या कविता  ह्या संग्रहास १९६८ साली महाराष्ट्र शासनाचा राज्यपुरस्कार (कवी केशवसूत पारितोषिक) लाभला. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.