एस एम जोशी

श्रीधर महादेव जोशी

अर्थात एस.एम. जोशी


( १२ नोव्हेंबर १९०४ - १ एप्रिल १९८९) 

हे स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील निःस्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये होते. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. त्यांचा प्रचंड  रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती. 




सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. या काळातच त्यांना साने गुरुजींची सहवास लाभला. राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एसएम यांची हजेरी असे.१९७६ ला ते लोकसभेत निवडून आले. याचसोबत ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. ‘ ऊर्मी ‘ हा कथासंग्रह, तसेच ‘ आस्पेक्ट्स ऑफ सोशलिस्ट पॉलिसी ‘ हा वैचारिक ग्रंथ अशी काही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय वर्तमानपत्रांतून त्यांनी बरेच स्फुट लेखनही केले आहे. ‘ लोकमित्र ‘ नावाचे दैनिक त्यांनी काही काळ चालविले होते. त्यांचे ‘ मी एसेम ‘ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 

( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.