हल्दिराम

पुस्तकाचे नाव - हल्दिराम
लेखिका - पवित्रा कुमार
अनुवाद - नीला चांदोरकर



एके काळी बिकानेरमधल्या धूळभरल्या रस्त्यांवरील खोपटवजा दुकानात त्यांच्या पूर्वजांनी धंद्याला सुरुवात केली. तिथून पुढे मजल दरमजल करत‚ साहसी उडी घेत त्यांच्या मुलांनी बंगाल‚ नागपूर आणि दिल्ली ही ठिकाणं काबीज केली अन् मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठही आपल्या कवेत घेतली.

२०१५ साली दिल्लीस्थित हल्दिराम कंपनीची वार्षिक उलाढाल जवळपास अडीच हजार कोटी होती. नागपूर व कोलकाता इथली उलाढाल वेगळी. 

हल्दिराम ची उत्पादने जवळपास शंभर देशांमध्ये निर्यात केली जातात, 

हल्दिराम कुटुंबाच्या व्यवसायाची सुरुवात या कुटुंबातील एका आदरणीय पुरुषानं− हल्दिराम यांनी− एक नवा उपाहारपदार्थ बनवून विकण्यानं केली. आपण सर्व जण तो पदार्थ भुजिया (एक प्रकारची शेव) या नावानं ओळखतो. त्यांनी त्यांच्या मूळ गावात− बिकानेरमध्ये− १९१८ मध्ये आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. हा कौटुंबिक व्यवसाय जवळजवळ शंभर वर्षं अनेक प्रकारच्या बदलांना तोंड देत आणि आव्हानांना समर्थपणे पेलत मोठा होत गेलाय‚ अन् आजमितीला त्यानं एका प्रचंड डेरेदार वृक्षाचं रूप धारण केलंय.

दुर्दम्य साहस‚ निर्मितिक्षमता आणि प्रचंड निर्धार या गुणांच्या बळावरच या कुटुंबानं राजस्थानातल्या एका छोट्याशा गावातील धुळीतून उड्डाण करत थेट जगभरातल्या गिऱ्हाइकांना वेड लावणाऱ्या ब्रँडचं रूप धारण केलंय. उत्तुंग यश हे कधीच सहजप्राप्य नसतं. या कुटुंबानं तर व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यवसायातही महाप्रचंड आव्हानांना सामोरं जात इथपर्यंतचा प्रवास केला आहे.

हल्दिराम हे नाव भारतीयांनी इतकं प्रेमभरानं जवळ केलंय‚ की त्याला आपल्या देशाच्या इतिहासात तोड नाही असं म्हटलं‚ तर ती अतिशयोक्ती ठरू नये. हल्दिराम कुटुंबाच्या पिढ्या न् पिढ्या या ब्रँडच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहत आल्या आहेत. कुटुंबातल्या प्रत्येक घटकानं त्याच्या वृद्धीत‚ प्रसिद्धीत आणि बदनामीतही आपापल्या परीनं भर घातलीये. बहुतेक कौटुंबिक व्यवसायात पाहायला मिळतं तेच या कुटुंबाच्या बाबतीतही घडलेलं आपल्याला दिसतं. गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंबात फारकती झाल्या आहेत. वेगळ्या चुली मांडल्या गेल्या आहेत. हल्दिराम हे ब्रँडनाव आता पूर्णपणे वेगळ्या असलेल्या तीन व्यवसायांनी धारण केलंय; हल्दिरामांचे नातू तीन वेगवेगळ्या ठिकाणी मूळ नावातील थोड्याफार फरकासह आपापला व्यवसाय समर्थपणे चालवत आहेत. नागपुरातील व्यवसायाचं नाव ‘हल्दिराम्स नागपूर’ असं आहे. कोलकाता येथील व्यवसाय ‘हल्दिराम भुजियावाला’‚ ‘हल्दिराम्स प्रभुजी’ आणि ‘हल्दिराम इन कोलकाता’ या तीन ब्रँडनावांनी‚ तर त्यांच्यातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील शाखेचं ब्रँडनाव ‘हल्दिराम्स’ असं आहे.


एकाच कुटुंबात जन्मलेले‚ तेच आनुवंशिक गुण घेऊन जन्माला आलेले आणि भुजियाविषयी तेच प्रचंड प्रेम मनात जोपासणारे भाऊ-भाऊ दर दिवशी स्वतःचं वेगळेपण जपण्याचा जिवापाड प्रयत्न करताना दिसतात. आपल्या स्वभाववैशिष्ट्यांनी चमकायचा प्रयत्न करतात. बाजारपेठेतल्या आपल्या विशिष्ट विभागाच्या मालकीबाबत ते अत्यंत जागरूक असतात. तरीही बाजारपेठेचं नेतृत्व याच भावांच्या हातात आहे. दिल्लीतल्या आणि कोलकातामधल्या न्यायालयामध्ये गेली पंचवीस वर्षं ते एकमेकांबरोबर लढत देत आहेत‚ कारण वारसाहक्कातला अधिक मोठा हिस्सा आपल्या पदरात पडावा‚ असं प्रत्येकाला वाटत आहे. तसं पाहिलं‚ तर या कुटुंबामध्ये जशी पुष्कळ मोठी गुंतागुंतीची प्रकरणं दडलेली आहेत− अनेक तट पडलेले आहेत− तशी एकमेकांबाबतची निष्ठाही आहेच. काही क्षण असेही येतात जेव्हा एका रक्ताचे हेच भाऊ आपापसातली नाती विसरतात आणि हमरीतुमरीवर येतात. 

दूर क्षितिजावर त्यांना स्पर्धा दिसते आहे. बदलणारा आधुनिक ग्राहक‚ आधुनिक व्यवस्थापनातील प्रश्न‚ अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन विभागाकडून त्यांच्या ब्रँडवर होणारे दोषारोप‚ खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल ( प्रभुशंकर अग्रवाल यांना तर जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती.) होणारी टीका/आरोप आणि कुटुंबात पदोपदी अनुभवाला येणारा संघर्ष दिसतो आहे. या कुटुंबातल्या लोकांनी अशा कित्येक सत्त्वपरीक्षांना तोंड दिलं आहे‚ 

असा हा हल्दिराम ब्रांडचा आणि या ब्रांडला जन्म देणाऱ्या अग्रवाल कुटुंबाची एका शतकाची भली बुरी जशी आहे तशी कथा, त्रयस्थपणे मांडलेला थरारक इतिहास. अनेक चढ उतार असलेला.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.