शरच्चंद्र चिरमुले

शरच्चंद्र चिरमुले 




( १५ जानेवारी १९३१ - २७ मार्च १९९२ ) ‘कामरूपचा कलावंत’ ही  पहिली कथा ‘वाङ्मयशोभा’मध्ये (१९४९) प्रसिद्ध झाली.  १९६७ साली प्रकाशित झालेली, स्वतःचा सूर गवसलेली ‘श्री शिल्लक’ ही त्यांची पहिली महत्त्वाची कथा ठरली. ‘श्री शिल्लक’ ते ‘पार्थिवाचे रंग’ या पाच कथासंग्रहांव्यतिरिक्त त्यांनी आत्मवृत्तात्मक ‘वास्तुपुरुष’ आणि ललित निबंध लेखन ‘जीवितधागे’  केले. चिरमुले यांनी कथालेखनाची वेगळी व स्वतंत्र पायवाट निर्माण केली. नवकथेतून कथालेखनाला बळ घेतले, पण अंधानुकरण केले नाही. फार मोठी प्रायोगिकता आणली नसली, तरी कथाप्रवाहावर स्वतःच्या कथालेखनाचा स्वतंत्र ठसा उमटवला.




 गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले यांच्या कथाजाणिवेशी त्यांचे जवळचे नाते आहे. कलावाद-जीवनवाद या वादचर्चेच्या अधीन न जाता व कथाविषयक कलात्मक जाणिवेचे भान गांभीर्याने ठेवून चिरमुले यांच्या कथेने मराठी कथेला वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनविले आहे.  




माणसाचे मन, त्याचे एकाकीपण, मृत्यू, मानवी जीवनातील रहस्यतत्त्व अशा आशयसूत्रांतून गंभीरपणे पाहणारे चिरमुले जीवनाकडे मिस्कीलपणेही जीवनाकडे पाहतात आणि त्यातून निखळ शुद्ध विनोदाचे दर्शन घडविणार्‍या विनोदी कथांचे दालन उघडले जाते. अर्थात अशा विनोदी कथा मोजक्याच पण दर्जेदार आहेत. ‘श्री शिल्लक’ या कथासंग्रहासाठी १९६८ साली ललित पारितोषिक मिळाले तर ‘कॉग्ज’ या कथासंग्रहासाठी १९७४-७५ साली महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘एका जन्मातल्या गाठी’ ह्या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार १९८६ साली तर ‘वास्तुपुरुष’ लेखसंग्रहासाठी कै.प्रा.वि.ह. कुलकर्णी पारितोषिक १९८८ साली त्यांना मिळाले. 


( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.