( २८ जुन १९३७ - २७ मार्च २०१८ ).
ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, समीक्षक, दलित साहित्य चळवळीचे भाष्यकार,पानतावाणे यांनी आपल्या आयुष्यात दलित साहित्याची भूमिका परखडपणे, जोरकसपणे मांडली. दलित साहित्य संकल्पनेला होणाऱ्या विरोधांचा तात्त्विक समाचार घेतला. त्यांनी विविध साहित्य संमेलनांमधून केलेली भाषणे याचा प्रत्यय देतात. या भाषणांचे संकलन महेंद्र गायकवाड यांनी विद्रोह, विज्ञान आणि विश्वात्मकता (२००८) या ग्रंथामध्ये केलेले आहे. विशेषत: २००९ मध्ये अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या जागतिक मराठी साहित्य् संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी दलित साहित्याने विश्व साहित्याला दिलेले योगदान स्पष्ट केलेले आहे.
पानतावणे यांनी दलित चळवळ व साहित्याला अस्मितादर्शच्या रूपाने स्वतंत्र विचारपीठ मिळवून दिले. अस्मितादर्श मेळावे व संमेलनांनी महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन गतिमान ठेवले. दलित- ग्रामीण मराठी शब्दकोशाचे केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये लंडन येथील भारतरत्न् डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय दलित साहित्य् अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, मसाप, पुणे यांचा डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, पद्मश्री दया पवार साहित्य पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट् भूषण पुरस्कार, दमाणी पुरस्कार, वाई येथील के. रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार तसेच केंद्र शासनाच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री पुरस्काराचा समावेश होतो.