मास्तरांची सावली

पुस्तकाचे नाव - मास्तरांची सावली
लेखिका - कृष्णाबाई नारायण सुर्वे
शब्दांकन - नेहा सावंत



कुठे रस्त्यावरचे फाटके आयुष्य, कुठे उपाशी पोटाच्या
वेदना, तर कुठे उभ्या महाराष्ट्राने भरभरून दिलेलं प्रेम. 

गंगाराम सुर्वे वुलन मिल मध्ये कामाला होते. कामावर जात असतांना कचराकुंडीपाशी बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बघीतलं तर एक दोन दिवसाचं तान्हं बाळ आक्रोश करीत होतं. अभाव ग्रस्ततेचाच संसार असुनही त्यांनी ते बाळ घरी आणलं, त्याचं नाव नारायण गंगाधर सुर्वे. 

कम्युनिस्ट चळवळीत काम करतांना भाषणे देतांना, आपलं म्हणणं नारायण समोरच्याला पटवून द्यायचा. चाळीच्या जवळच त संध्याकाळी प्रौढ साक्षरता प्रसाराचे वर्ग घेऊ लागला. स्वतः तेव्हा तिसरीच शिकला होते पण मग अगदी मन लावून तो कामगारांना लिहायला वाचायला शिकवायचा म्हणून लहानथोर सगळेच मास्तर म्हणून ओळखायचे. पुढे नारायण एका शाळेत शिपायाची नौकरी करून त्याच शाळेत नंतर खरेखुरे मास्तरही झाले. 

कृष्णाबाई दीड दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईने आत्महत्या करून स्वतःला संपवलं. पुढे कृष्णाचं संगोपन आजीनेच केलं. कृष्णाबाईंची आणि मास्तरांची ओळख चाळीतलीच. कृष्णाबाईंच्या आजीला मास्तरांबद्दल विशेष महत्त्व वाटत असे. पुढे घसट वाढत गेली. आजी वारल्यावर एकट्या पडलेल्या कृष्णाबाईंनी घरचा विरोध न जुमानता मास्तरांशी लग्न केलं तेव्हा समोरचं भविष्य अत्यंत काळोखलेलं होतं. कृष्णाबाई आता मास्तरांची किशा झाली. 
झोपडपट्टीत राहणं, खायला कधी मिळायचं कधी नाही. पुढे मास्तरांना शाळेत शिपायाची नौकरी मिळाली तेव्हा जरा बरे दिवस दिसू लागले. 


वाचनाची आवड अगोदरपासून होती. शाळेच्या नौकरीमुळे ती अधिकच वाढली. मग जे सुचेल ते लिहू लागले. शाळेच्या दुसऱ्या शाखेत कृष्णाबाई शिपाई म्हणून नौकरीला लागल्या. संसाराला हातभार लावण्यासाठी. 

चळवळीच्या कामामुळे मास्तरांचे घरात फारसे लक्ष नव्हते. कृष्णाबाईंनीच सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुलांच्या लसीकरणापासून शाळेत दाखल करणे वगैरे सगळ्याच. 

मास्तरांचा पहिला कवितासंग्रह कृष्णाबाईंचे मंगळसूत्र मोडून झाला. त्याला शासनाचा पुरस्कार मिळताच अगोदरपेक्षाही मोठे मंगळसूत्र मास्तरांनी बनवून दिले. 

आता मास्तरांना प्रसिध्दी मिळू लागली तसे व्यापही वाढू लागले त्यामुळे घराकडे जास्तच दुर्लक्ष होऊ लागले. पण कृष्णाबाईंनी कधी तक्रार केली नाही. मास्तर आता महाराष्ट्राचे झाले. वाढलेल्या व्यापामुळे तब्येतीची हेळसांड होऊ लागली. मुले मुली मोठी होऊन दुरावत होती. एक मुलगा तर अकाली गेला. या काळात एकमेकांच्या सोबतीने यातना सुसह्य झाल्या. 

नंतर मास्तरांच्या अखेरच्या काळात जे वाट्याला आलं ते फार दुःखदायक होतं. वारंवारच्या आजारपणाने पैशाला वाटा फुटल्या.रक्ताच्या नातेवाईकांनीही लुबाडलं. त्याही पेक्षा वेदनादायी काही असेल तर मास्तर गेल्याची बातमी टीव्हीवरील बातम्यांमुळे समजणं. 

मास्तर आणि किशाची ही कहाणी वाचायला घेतली की पुस्तक खाली ठेववत नाही. ‘मास्तरांची सावली’ या आत्मकथनातून सुमारे सहा सात दशकांची सहजीवनाची कहाणी कृष्णाबाईंनी अतिशय निरालसपणे मांडली आहे. मात्र त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.