लेखिका - शुभदा गोगटे
हिंदुस्थानात पहिली रेल्वे सुरु करणारी ब्रिटिश कंपनी ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे ही होती तर पहिली संस्थानी रेल्वे सुरु करणारं संस्थान बडोदा होतं.
१८६२ साली बडोद्याचे तेव्हाचे राजे खंडेराव यांनी त्यांच्या राज्यात आगगाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. वापरलेल्या रुळांना वाफेच्या इंजिनांचं वजन न पेलल्यामुळे त्या मार्गावर आगगाडी सुरु होऊ शकली नाही. त्या ऐवजी त्या मार्गावर बैलांनी किंवा घोड्यांनी ओढली जाणारी गाडी सुरु झाली.
खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या मल्हारराव महाराजांनी रेल्वे परत सुरू करण्याचे ठरवले. इंग्रज अधिकारी काय सांगतात ते आपल्याला समजत नाही, आपण काय सांगतो हे त्यांच्या लक्षात येत नाही, अशा परिस्थितीत फसवणूकीची शक्यता नाकारता येत नाही म्हणून रेल्वेच्या कामाची माहिती असलेला व इंग्रजी बोलता येणारा आपल्यातला कोणीतरी त्यांना हवा होता.
त्यांना नारायणचं नाव सुचवलं गेलं. आणि जणू नारायणचा भाग्योदय झाला. सरकारी अधिकारी म्हणून प्रशस्त घर, घोडागाडी, नोकरचाकर मिळाले. एकट्या राहणाऱ्या नारायणने आपले कुटुंब बडोद्याला बोलवून घेतलं. आणि स्वत: रेल्वे उभारणीच्या कामात मग्न झाला.
बोरीबंदर ते ठाणे ह्या पहिल्या लोहमार्गाचं काम मुंबईत सुरु असताना ते बघण्यासाठी रोजच गर्दी जमत असे. पूर्वी कधी न पाहिलेले आणि नवलाईचे असे ते रुळ, इंजिनं, डबे, इंजिनातून निघणारा धूर, त्यानं मारलेल्या शिट्या आणि कुठल्याही जनावराशिवाय त्याचं वेगानं पळणं हे सगळं बघून लोक आणि विशेषत: लहान मुलं प्रभावित होत.नारायण हा असाच एक भारलेला आणि रेल्वेच्या प्रेमात पडलेला मुलगा. घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे आणि वडील सतत आजारी पडत असल्यामुळे शाळेचं शिक्षण अर्धवट सोडून त्यानं नोकरी करणं अपरिहार्य ठरलं.
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आगगाडीच्या वर्कशॉपमध्ये नोकरी करु लागला. पुढे खंडाळ्याच्या घाटाचं बांधकाम सुरु झाल्यावर आणि त्या कामासाठी पगार चांगला मिळेल हे कळल्यावर तो त्या कामावर गेला, घाटातलं बांधकाम संपल्यावर जी. आय. पी. रेल्वे कंपनीने त्याला इगतपुरीला देखरेख विभागात पाठवलं. मात्र त्याची खरी मनापासूनची इच्छा इंजिन ड्रायव्हर बनण्याची होती. तोपर्यंत हिंदुस्थानात ३-४ रेल्वे कंपन्या सुरु झालेल्या होत्या.
इंजिन चालवणं हे विशेष कौशल्याचं काम आहे आणि म्हणून ते हिंदुस्थानी लोकांना जमणार नाही असं ठरवून त्या कामासाठीचं प्रशिक्षण फक्त पाश्चात्त्यांना देण्याच्या काही शाळा रेल्वे कंपन्यांनी सुरु केलेल्या होत्या. नारायणच्या विशेष ओळखीच्या आणि त्याच्याविषयी प्रेम असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीनं तो अशा एका शाळेत प्रवेश मिळवला. रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर म्हणून बॉम्बे बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इन्डिया रेल्वे’ (बी.बी.अॅण्ड सी.आय.आर.) कंनीचा इंजिन ड्रायव्हर होऊन आणि शंटिंग ड्रायव्हर म्हणून त्याची बडोद्याला बदली झाली होती.
जेव्हा तो सुरुवातीला बडोद्याला आला होता तेव्हा खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचा मर्जीतील अनेक जण बडोदा सोडून जातांना त्याला दिसले होते. आपल्यालाही बडोदा सोडून पळ काढावा लागेल अशी कल्पनाही कधी मनात आली नव्हती. पण घटना इतक्या वेगाने घडल्या की नारायणला विचार करायलाही सवड मिळाली नाही.
ही फक्त नारायणची गोष्ट नसून त्याच्या बरोबरीने बडोदा संस्थानाची कथा आहे. संस्थानिक व ब्रिटिश रेसिडेंट यांच्यातील संघर्षाचा काळ होता. १८५७ च्या उठावानंतर हा संघर्ष तीव्र होऊन ब्रिटीशांचा प्रभाव वाढत होता. खंडेराव महाराजांची ब्रिटीशांशी तडजोडी ची वृत्ती होती तर मल्हारराव महाराज अरेरावी करणारे छदीफंदी स्वभावाचे होते. यात त्रास होत होता ते बडोद्याच्या जनतेला.
१८५७ च्या बंडानंतरचा जवळपास दिड दशकाचा बडोद्याच्या अस्थिर राजवटीचा तेव्हाचा कालखंड अत्यंत बारकाईने रेखाटला आहे. जातिभेद, सोवळंआवळं, संस्थानिकांचा विक्षिप्तपणा, इंग्रज अधिकाऱ्याकडून नारायणला मिळणारी सापत्न वागणूक, नंतर बडोदा संस्थानाचा अधिकारी म्हणून बरोबरीने वागवतांना होणारा जळफळाट हे वाचतांना आपोआप आपण त्या काळाशी तुलना करू लागतो.
सत्य आणि कल्पिताचे अद्भुत मिश्रण असणारी ही कांदबरी खिळवून ठेवते.
,