(८ मार्च १९३०–२६ एप्रिल १९७६).
प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने कवितालेखन.खानोलकर मूलतः कवी आहेत. त्यांचे कविव्यक्तिमत्त्वच त्यांच्या लेखनात आढळणाऱ्या एकसंघतेच्या मुळाशी आहे. शब्दांचे अर्थ व ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेतात. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात.
त्यांचे कवितासंग्रह : जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे व कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी , अजगर , कोंडुरा, त्रिशंकू शिवाय नाटके : एक शून्य बाजीराव , सगेसोयरे , अवध्य , कालाय तस्मै नमः असून कथासंग्रह : सनई , गणुराया आणि चानी , राखी पाखरू प्रसिद्ध आहेत.ह्यांशिवाय बालगीते (गोपाळ गाणी,), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा,) व व्यक्तिचित्रे (दीपमाळ,) असेही लेखन त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाची आठ पारितोषिके त्यांच्या विविध साहित्यकृतींना मिळालेली आहेत. १९६४ मध्ये ‘रायटर्स सेंटर’ ह्या संस्थेतर्फे लेखनसंकल्प पुरे करण्यासाठी त्यांना सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती देण्यात आली. ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ ने दशावतार ह्या लोकनाट्यप्रकाराच्या अभ्यासासाठी त्यांना संशोधन-शिष्यवृत्ती दिली (ऑक्टोबर ७२ ते सप्टेंबर ७४). कालाय तस्मै नमः ह्या त्यांच्या नाट्यकृतीची १९७२ मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून आकाशवाणीतर्फे निवड झाली. तिचा सर्व भारतीय भाषांत अनुवाद करण्यात आला.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)