(२७ एप्रिल १८८३–२३ सप्टेंबर १९६४).
मराठीतील पुरोगामी नाटककार आणि कादंबरीकार. मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध. किर्लोस्करप्रणीत रंगभूमीचा पुढे बराच विस्तार झाला, तरी तिचा चेहरामोहरा दीर्घकाल पौराणिक-ऐतिहासिक थाटाचा व संगीतप्रधान असाच राहिला. पण मराठी नाटक वास्तववादी व सुटसुटीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न वरेरकरांनी केला. समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालणारे विषय त्यांनी आपल्या नाटकांसाठी निवडले. मराठी रंगभूमीवर माजलेले संगीताचे अवाजवी प्रस्थ त्यांनी कमी केले. त्यांची दृष्टी आधुनिक व प्रयोगशील होती. नाटकांतल्या स्वगतांना त्यांनी फाटा दिला. एक अंक एक प्रवेश हे रचनातंत्र यथावकाश स्वीकारले.
तत्कालीन सामाजिक, राजकीय आंदोलनांचे प़डसाद त्यांच्या नाटकांत उमटले. हाच मुलाचा बाप ह्या नाटकात त्यांनी हुंड्याचा प्रश्न मांडला. संन्याशाचा संसार हे त्यांचे नाटक पतितपरावर्तनाच्या प्रश्नावर आधारलेले आहे. असहकारितेची चळवळ जोरात असताना, तिच्या प्रभावाखाली त्यांनी सत्तेचे गुलाम लिहिले. तुरुंगाच्या दारात (१९२३) ह्या त्यांच्या नाटकाचा विषय अस्पृश्योद्धार हा आहे, तर सोन्याचा कळस हे नाटक मजूर-मालक संघर्षावर लिहिले आहे. रामाने सीतेवर केलेला अन्याय त्यांनी भूमिकन्या सीता ह्या नाटकातून प्रभावीपणे उभा करून पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला केला . वरेरकरांनी कादंबऱ्याही विपुल लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यांतही अनेक सामाजिक प्रश्नांचे चित्रण येते. संसार की संन्यास (१९११) ही त्यांची पहिली कादंबरी पण विधवाकुमारी (१९२८) ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. धावता धोटा (१९३३) ही त्यांची कादंबरीही उल्लेखनीय आहे. तीत गिरणगावातील जीवनाचे आणि तिथल्या आसमंताचे प्रत्ययकारी चित्र वरेरकरांनी उभे केले आहे. मराठीतल्या पहिल्या राजकीय कादंबरीचा मान काही समीक्षकांनी ह्या कादंबरीला दिलेला आहे.
बंगाली कथा-कादंबऱ्यांचे त्यांनी केलेले अनुवाद हा त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू. हे अनुवाद सहजरम्य व सरस उतरले आहेत. पुणे येथे १९३८ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. धुळे येथे १९४४ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे ते अध्यक्ष होते. १९५६ साली भारत सरकारकडून पद्मभूषण ही पदवी त्यांना देण्यात आली. १९५९ साली त्यांना पद्मविभूषण ही पदवी देण्यात आली.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)