लेखक - उमेश झिरपे
शब्दांकन - मुक्ता चैतन्य
पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेच्या सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणाऱ्या मावळ्यांनी एव्हरेस्टवर झेंडा फडकवला त्याची गोष्ट.
तेरा क्लाइंबिंग मेंबर आणि सपोर्ट चे आठ अशी एकवीस जणांच्या टिमने एव्हरेस्टवर चढाई केल्यावर तेरा पैकी आठ जणांनी एव्हरेस्ट शिखर सर करुन भारतीय विक्रम नोंदवला. या अभूतपूर्व यशानंतर पुढच्याच वर्षी एव्हरेस्ट ल्होत्से अशी दुहेरी मोहीम आखली. या मोहिमेत तिघांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली तर आदल्या वर्षी एव्हरेस्टवर जाऊन आलेल्या एकाने एकट्याने जगातील चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से शिखर सर केलं.
२००७ साली गिरिप्रेमी संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तरुणांना गिर्यारोहणाकडे आकर्षीत करण्यासाठी भव्य दिव्य काहीतरी करण्याच्या विचारातून या एव्हरेस्ट मोहिमेच्या कल्पनेचा जन्म झाला.
शारीरिक क्षमता व मानसिक कणखरपणाची कसोटी बघणाऱ्या या मोहिमेसाठी निवड झालेल्यांच्या घरच्या लोकांची परवानगी घेणंही काही सहजसाध्य नव्हतं. एकाचं नुकतच लग्न झालेलं होतं. एकाचे वडील व्यवसायातून निवृतीचा विचार करीत होते त्यांना आपली निवृत्ती किमान दोन वर्षे पुढे ढकलावी लागणार होती. शिवाय प्रत्येकाला या मोहिमेसाठी एक लाख रुपये द्यायचे होते. एकंदर खर्च जवळपास अडीच तीन करोड रुपये येणार होता.
नंतर मोहिमेसाठी निधी उभा करण्यासाठी वणवण झाली. कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या मोठ्या कंपन्यांनी कौतुक खूप केले पण पैशासाठी हात आखडता घेतला. मग काही पत्रकार मित्रांनी जन सहभागातून निधी उभारण्यची कल्पना दिली. पत्रकार परिषद घेतली गेली आणि माध्यामातून जनतेला आवाहन करण्यात आले. हळूहळू पैसे जमायला सुरुवात झाली. पन्नास रुपयांपासून पाच हजार, पन्नास हजाराच्या देणग्या येऊ लागल्या. अंदाजित आकडा गाठायला काही लाख कमी पडत होते. मनसेचे नेते श्री अनिल शिदोरे यांना हे समजल्यावर त्यांनी राज ठाकरेंना सांगीतले. राज ठाकरे यांनी लगेच खाजगी खात्यातून दहा लाख रूपये दिले.
दरम्यान एव्हरेस्ट टिमची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शास्रोक्त पध्दतीने व्यायाम चालू होता. पर्वती चढणं, सिंहगडावर खालीवर करणं, नंतर सोबत्याला खांद्यावर घेऊन पर्वती चढतांना बघून पुणेकरांनी या मोहिमेची बातमी घरोघरी पोहचवली.
अशा मोहिमांमध्ये रेडी टू कुक असे खाद्यपदार्थ असतात. असे सगळे पदार्थ परदेशी चवीचे आणि अत्यंत महाग होते. डीआरडीओच्या एका शास्रज्ञाच्या भेटीत समजले की, त्याच सुमारास भारतीय लष्करातील महिलांची तुकडीचीही एव्हरेस्ट मोहिम नियोजित होती. तेव्हा डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी गिरिप्रेमी टिमसाठीही खाद्यपदार्थ देण्याचे कबूल केले.
सगळ्या अडीअडचणी पार करून कुटुंबियांच्या आणि पुणेकर नागरिकांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन गिरिप्रेमी टिम उमेश झिपरे यांच्या नेतृत्वाखाली काठमांडूला येऊन पोहोचली.
त्यानंतरची कहाणी मुळातच वाचयलाच हवी अशी आहे. बेभरवशाचे वातावरण, आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, काही वेळा संपर्क तुटल्याने जाणवणारी अस्वस्थता, शेर्पा मंडळीचे अनन्यसाधारण महत्त्व, दोन जणांना अर्ध्या वाटेवरून माघार घेतांना आलेलं नैराश्य, आठ जणांनी शिखरावर तिरंग्यासोबत फडकवलेला भगवा... हे सगळं वाचताना भारावल्यासारखं होतं.
जेव्हा तुम्ही एका संघाचे नेतृत्व करीत असतात, तेव्हा वैयक्तिक कामगिरी पेक्षा सांघिक कामगिरी मोलाची असते याची जाणीव उमेश झिरपे यांच्या नेतृत्वगुणात दिसते. त्यांना स्वत:ला एव्हरेस्टवर जाता आले नाही. सोबत्यांना ऐनवेळी काही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी त्यांनी मागे राहायचे हा त्यांचा निर्णय होता. तरीही टिम यशस्वी झाल्याचा त्यांना झालेला आनंद सगळ्यात मोठा होता.
या मोहिमेत गिरिप्रेमी संस्थेने केलेले अजून एक मोठे काम म्हणजे बेसकँप जवळच्या गोरखशेप गावातील पासांग शेर्पा यांच्या हाॅटेल हिमालय च्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा. एव्हरेस्ट समीटर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री वांगचू शेर्पा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
अशा या साहसी थरारक मोहिमेची कल्पना कशी स्फुरली इथून सुरुवात करून मोहिमेची संपूर्ण कहाणी उमेश झिरपे यांनी या पुस्तकातून सांगीतली आहे. मुक्ता चैतन्य यांनी ही गोष्ट शब्दबद्ध करतांना अशी काही रंगवली आहे की वाचकांच्या मनावर एखाद्या थरारकथेसारखा परिणाम होतो.