(१८ जानेवारी १८९५ - ३ मे १९७८).
मराठी लेखक व शिक्षणतज्ञ. त्यांनी शालेय पुस्तके, शैक्षणिक ग्रंथ, कविता, व्यक्तिचित्रे, ललित निबंध, आत्मवृत्त, नाटक इ. विविध प्रकारचे लेखन केले. शिक्षण आणि व्यवसाय यांच्या निमित्ताने महाराष्ट्र, माळवा, गुजरात, कर्नाटक अशा विविध प्रदेशांत तसेच परदेशातही वास्तव्य घडल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहुरंगीपणा आला.
त्यांच्या जीवनविषयक व्यापक आणि समृद्ध जाणिवांचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो.
‘रविकिरण मंडळा’चे ते सदस्य होते. प्रथम ‘मधुकर’ या टोपणनावाने ते कविता करीत. मधु-माधव (१९२४) या संग्रहात माधव जूलिअन् यांच्याबरोबर त्यांच्याही कविता संगृहीत झालेल्या आहेत. नाट्यरूप महाराष्ट्र (१९२६), नाना देशांतील नाना लोक (१९३३) ही शालेय पुस्तके काही म्हातारे व एक म्हातारी (१९३९), पांढरे केस, हिरवी मने (१९५९) हे व्यक्तिचित्रांचे संग्रह मनोगते (१९६६), विचारविलसिते (१९७३) हे ललित-वैचारिक निबंधाचे संग्रह दिवस असे होते (१९६१) हे आत्मचरित्र, ही त्यांची ग्रंथसंपदा विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय टीचिंग ऑफ हिस्टरी (१९३८), इतिहास : शास्त्र आणि कला (१९५८), यशवंतराव होळकर (नाटक, १९६२), बाजी व डॅडी (नाटिका, १९६४), तांबडं फुटलं (१९६९) ही पुस्तकेही त्यांनी लिहिलेली आहेत.
त्यांचे पुष्कळसे लेखन स्वान्तःसुखाय झालेले आहे. त्यांचे उत्कट पण दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सौंदर्यदृष्टी, इतिहासप्रेम, जीवनाविषयीची आंतरिक ओढ आणि अभिजात रसिकता यांचा त्यात मिलाफ झालेला दिसतो. त्यांची गद्यशैलीही सुटसुटीत, रसपूर्ण आणि लयदार आहे. १९५३ साली अहमदाबाद येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला होता.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)