आधुनिक मराठी कवी. नाव आत्माराम रावजी देशपांडे. ‘अनिल’ या टोपण नावाने काव्यलेखन. फुलवात हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (१९३२). त्यात १९२० ते १९३१ या कालखंडातील त्यांच्या कविता आहेत. या कवितांत प्रेमजीवनातील उत्कट अनुभूतींचा गूढ व प्रतीकात्मक आविष्कारआढळतो.
प्रेम आणिजीवन (१९३५), भग्नमूर्ति (१९४०) व निर्वासित चिनी मुलास (१९४३) ही त्यांची खंडकाव्ये मुक्तच्छंदातच रचिलेली आहेत. मुक्तच्छंद हा अनिलांच्या पुरस्काराचा, प्रयोगशीलतेच्या व जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘मुक्तछंद’, ‘मुक्तछंदः वादाचा थोडा इतिहास व विचार’ आणि ‘मुक्तछंदाची आवश्यकता’ हे त्यांचे या संदर्भातील महत्त्वाचे लेख.
भग्नमूर्ति या खंडकाव्याच्या दुसऱ्या आवृत्तीत (१९६५) ‘मुक्तछंदाचे वाचन’ व ‘मुक्तछंद का म्हणून ?’ या विषयांवरील परिशिष्टे आहेत. प्रेमजीवनाची उदात्तता, सामाजिक उद्बोधन व व्यापक मानवतावाद हे त्यांच्या आशयाचे विशेष आहेत. त्यांच्या काव्यात ‘रविकिरणमंडळा’ च्या काव्यसंकेतांविरुद्ध झालेली प्रतिक्रिया आढळते आणि काव्यविचारात अशा प्रतिक्रियेबरोबर नवकाव्यातील काही प्रवृत्तींचा निषेध दिसून येतो.१९६६ मधील विदर्भ साहित्य संमेलनाचे व १९५८ मधील मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ते साहित्य अकादेमीचे सभासद होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सभासद होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)