लेखिका - इझाडोरा डंकन
अनुवाद - रोहिणी भाटे
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
इझाडोरा डंकन ( १८७७ - १९२७ ) ही अमेरिकन नृत्यांगना
होती. नृत्यामध्ये तिने क्रांतिकारी बदल घडवून आणले. नृत्यावरील कृत्रिम तांत्रिक बंधने झुगारून सहज, नैसर्गिक व उत्स्फूर्त शारीरिक हालचालींचा तिने नृत्यातून अविष्कार घडविला. या दृष्टीने ती आधुनिक नृत्याची जनक मानली जाते.
तिने लिहिलेल्या "माय लाईफ" या आतमकथनाचा हा अनुवाद.
बालपण सगळं अभावग्रस्त होतं. आईने घटस्फोट घेतलेला. चार मुलांच्या पोषणाची जबाबदारी तिचीच होती. संगिताच्या शिकवण्या करुन ती घर चालवीत होती.
सहा वर्षाची असतांना इझाडोराने आसपासच्या काही मुलामुलींना घरात बोलवून नृत्य करतांना हातपाय कसे हलवावे हे सांगत असतांना आई आली. ही माझी नृत्याची शाळा आहे हे ऐकल्यावर आई पियानो वाजवायला बसली. ही शाळा चांगलीच चालली. काही पालक होऊन पैसे देऊ लागले पुढे जाऊन या शाळेचा नावलौकीक खूप वाढला. अनेक घरंदाज श्रीमंतांच्या घरी जाऊन नृत्य शिकवू लागल्या.
इझाडोरा सगळ्या भावंडांमध्ये लहान होती मोठा ऑगस्टिन काव्य वाचन करायचा, इझाडोरा नाचायची मग चारही भावंडं मिळून प्रहसन सादर करायचे. लोकांना आवडतं समजल्यावर सॅन फ्रान्सिस्को तसेच आसपासच्या शहरातही त्यांनी यशस्वी दौरे केले. त्यावेळी इझाडोरा होती बारा वर्षाची.
काही वर्षांनंतर इझाडोरा कुटुंबासह न्युयॉर्कला आली. याच वेळी तिचे वाचन वाढले. डिकन्स, शेक्सपियर, थॅकरे पुर्णपणे वाचले. शिवाय समोर जे येईल ते वाचत राहिली.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतांना एखादा नृत्याचा कार्यक्रम तिकीट काढून पाहायचा असला तर त्या दिवशी जेवण टाळावे लागायचे.
नंतरही संपूर्ण युरोपात तिचे कार्यक्रम होऊनही तिच्या अव्यवहारी स्वभावामुळे तिच्या आर्थिक परिस्थितीला स्थिरता मिळाली नाही.
अशी हालाखीची परिस्थिती असुनही एकदा तिने जर्मनीमध्ये मिळालेल्या एका सर्वसाधारण थिएटर मध्ये कार्यक्रमाची संधी तिने धुडकावून लावली. त्या काळात एक हजार मार्क्सचं मानधन भरपूर मानलं जायचं तरीही तिने नकार दिला.
" एक दिवस मी बर्लिनला येणारच आहे गटे आणि वाॅग्नर यांच्या देश बांधवांसाठी मी नाचणार आहेत पण ते त्यांच्या इभ्रतीला शोभून दिसेल अशा दर्जेदार रंग मंदिरात. आणि बहुदा हजार मार्क्स पेक्षाही जास्त मानधन घेऊन."
त्यानंतर तीन वर्षांनी बर्लिनच्या प्रसिद्ध फिलामोनिक ऑर्केस्ट्राच्या साथीवर जगप्रसिद्ध क्राॅलस ऑपेरा हाऊस मध्ये तिच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री पंचवीस हजार मार्क्सच्या पुढे गेली होती. त्यानंतर तिचा कार्यक्रम संपल्यावर तिचे चाहते तिच्या गाडीचे घोडे सोडवून तिची गाडी ओढत मिरवत तिला तिच्या मुक्कामी पोहोचवायचे. असच प्रेम तिला ग्रीकांनी दिलं.
तिचे कुटुंब म्हणजे तिची आई, बहीण भाऊ हे तिच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिले. त्या जोरावरच ती इतकं सगळं करु शकली. तिला नाही मिळाला तो योग्य जोडीदार. तिचा लग्नसंस्थेवर विश्वास नव्हता. विवाह विधीत अंतर्भूत असलेल्या अन्यायाधिष्टित निती नियमांचं पालन करणे स्वतंत्र प्रज्ञेच्या स्त्रीच्या लेखी अगदी अशक्य बाब आहे असं ती मानायची. तशी तिची प्रेमप्रकरणे खुप झाली, मात्र शेवटपर्यंत एकही टिकलं नाही.
तिला देशविदेशात जशी प्रसिध्दी मिळाली तसा काही ठिकाणी तिच्या अधुनिक नृत्यशैलीमुळे विरोधही सहन करावा लागला.
इझाडोराला नृत्यशाळा काढायची होती. देश विदेशातील मुले शेकडो मुलांना नृत्य शिकवण्याची तिची इच्छा होती. तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे जमत नसलं तरीही तिने चाळीस मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था केली होती. ज्या देशात जायची त्या देशाच्या सरकारकडे अशा शाळेची मागणी करायची.
मध्यंतरीच्या काळात तिची लहान मुले अकस्मात दगावल्याने ती खुप सैरभैर झाली होती. त्यातून सावरते न सावरते तोच काही वर्षांनी झालेलं मुल काही दिवसातच गेल्यावर तिच्या जगण्याची उर्मी खलास होत असतांना तिला रशियन सरकारने तिच्या कल्पनेतील शाळेसाठी आमंत्रित केलं.
तिच्या वाट्याला नियतीने कमी आयुष्य दिलं. जेमतेम पन्नास वर्षांचं. यातही अधुनिक नृत्यशैलीमुळे ती देशविदेशात फिरली. रसिकांचं प्रेम मिळवलं. आर्थिक परिस्थिती सूद्धा खालीवर होत राहीली. परंतु तिने तिच्या कलेशी कधीही प्रतारणा केली नाही. आणि कोणाच्याही मदतीसाठी हात आखडता घेतला नाही. शेवटी ध्यानीमनी नसतांना अपघाती मृत्यू आला.
रोहिणी भाटे या स्वतः यशस्वी नृत्यांगना असून अनुवाद करतांना इझाडोराच्या भावनांना योग्य न्याय दिला असून त्यासाठी अगदी चपखल शब्दयोजना करून अत्यंत सुरस व वेधक अनुवाद केला की वाचक मंत्रमुग्ध होतो.
मी इझाडोरा हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर इ-बुक स्वरुपात मोफत उपलब्ध आहे.