वाटवे यांचे लेखन संस्कृत साहित्यशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. ‘मराठी पंडित कवी’ (१९५३) हे त्यांचे पुस्तकही समीक्षेच्याच अंगाने जाणारे आहे. ‘रसविमर्श’ (१९६१), ‘संस्कृत नाट्यसौंदर्य’ (१९६२) आणि ‘संस्कृत काव्याचे पंचप्राण’ (१९४७) ह्या त्यांच्या पुस्तकांचे स्वागत विद्वानां, संशोधक, हौशी व जिज्ञासू वाचक आणि विद्यार्थी अशा सर्वांकडून सन्मानपूर्वक झाले.
‘रसविमर्शा’मध्ये भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा परामर्श घेऊन ऐतिहासिक व तौलनिक दृष्टिकोनांतून रसविषयक चर्चा केली आहे. रसनिष्पत्तीची प्रक्रिया आणि रसास्वाद यांचे मानसशास्त्रदृष्ट्या परीक्षण करून रसांच्या गौणप्रधान भावाचीही चर्चा केली आहे. भक्ती हा रस मानावा की नाही, याचीही चर्चा यात केली आहे. या पुस्तकाचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे मराठीचे स्वतंत्र साहित्यशास्त्र निर्मिण्याचा हा पायाभूत प्रयत्न आहे.
संस्कृत नाट्यसौंदर्य या ग्रंथातून संस्कृत नाट्यशास्त्र आणि नाट्यवाङ्मय यांची विषयाच्या सर्व आयामांनिशी परिपूर्ण माहिती दिली आहे. संस्कृतातल्या नऊ प्रमुख नाट्यकृतींच्या नाट्यकथांचे मूळ, त्यांच्या संविधानक रचनेची वैशिष्ट्ये आणि नाट्यगृह या अंगांनी चर्चा करून संस्कृत नाटकांच्या उत्कर्षाच्या आणि र्हासाच्या कालखंडांचीही समीक्षा केली आहे.
याखेरीज या प्रत्येक महाकाव्याचा स्वतंत्रपणे परिचय करून देणारी, आणि कादंबरी, मेघदूत यांचाही रसाळ भाषेत परिचय करून देणारी पुस्तके त्यांनी लिहिली.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)