ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन "अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर" कविता असे केले जाते.
रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे अध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.