के कनेक्शन

पुस्तकाचे नाव - के कनेक्शन
लेखक -  प्रणव सखदेव. 
रोहन प्रकाशन






कुमार चे कल्याणशी असलेलं हे कनेक्शन काही साधेसुधे नाही. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच कुमारावस्थेशी जोडणारं आहे. आई, आजीकडे धरलेला हट्ट, दबक्या आवाजात बाबांकडे केलेल्या मागण्या, दादा कडून जवळपास जबरदस्तीने करवून घेतलेले लाड, असं सगळं जे स्मृती कोशात तळाशी जाऊन बसलयं ते ढवळून निघतं आणि एक एक आठवणी जाग्या होत राहतात.

त्या काळात मित्र म्हणजे एक वेगळं जग असतं, त्यांच्या सोबत केलेले, काही जाणूनबुजून तर काही अवचित घडलेले कांड शेवटपर्यंत विसरता येत नाही. म्हणून तर मग फ्रेंडशिप च्या दिवशी एक वर्षाने सिनियर असलेल्या शाळेतल्या सगळ्यात सुंदर समजल्या जाणाऱ्या मुलीला पहिला फ्रेंडशिप बॅंड बांधण्याचं आव्हान स्वीकारलं जातं. त्याचा शेवट भलताच काही होतो हे वेगळं. मित्राने भारी पैकी सायकल घेतल्यावर असुयेपोटी घडलेलं कांड आयुष्यात पश्चातापाशिवाय काही देऊ शकत नाही याची तेव्हाच होणारी जाणीव अत्यंत महत्त्वाची ठरते. 

वरचेवर भेटणारी कुटुंबाच्या बाहेरील माणसंही काही तरी शिकवतच असतात. भाजीवाली आक्का नवरा मेल्यावर दुसऱ्याच दिवशी बाजारात दुकान मांडून बसते. आता एकटीच राहशील का.. याचं उत्तर देताना उसळते, दारुड्या होता तो, मी घर चालवते, तो गेला मी सुटले...नंतरचा  'काहीही झालं तरी आपल्या पायावर ताठ उभं राहायचं हा तिने केलेला उपदेश विसरला जात नाही. 
आईला सांगणार नाही. क्लासला दा़डी मार, फिरून येऊ. पण रोज रोज नाही हं, म्हणणारे आणि आल्यावर बोरकुट देणारे आदुकाका जे पत्नीला आई समजतात. ती सगळ्यात जास्त काळजी घेते म्हणून. असे आदुकाका सगळ्यांनाच भेटतात असेही नाही. 

त्या काळी आईसक्रीम खाणं ही मोठी चंगळ समजली जायची तेव्हा फक्त कुमारसाठी वरचेवर आईसक्रीम आणून देणारे अवाढव्य देहाच्या फडतळकर आण्णाचं मन मोठं नाजूक होतं. त्यांच्याविषयी सोसायटीत काय काय बोललं जायचं. काहींनी तर समोरच्या फ्लॅट मधल्या भाभींशी बदनारायण संबंध जुळवून टाकले होते. वास्तविक ती घरच्यांचा जाच सोसणारी, वाचनाच्या आवडीचं बलिदान देणारी होती.  तिचा शेवट मोठा ह्रदयद्रावक होता. आणि आईसक्रीम वाल्या फडतळकर आण्णांचा सुध्दा. 

शाळेत असतांना साळुंके मॅडम ने जे संस्कार केले त्याचा  परिणाम म्हणजे वाचन करता करता घडलेला लेखक. अशा साळुंके मॅडम प्रत्येक शाळेत असायला हव्यात. 

त्या वयात शरीरातील बदल घडत असतांना मानसिक अवस्थेत स्थित्यंतर होत असतं. आता आपण मोठे झाल्याची भावना जबाबदारीची जाणीव करून देते त्याचवेळी आता आपल्याला खुप काही समजायला लागलय हा अहं वाढू लागतो जरी इतरांच्या नजरेत आपण लहान असलो, आपल्याला फारसं काही समजत नसलं तरीही. त्यामुळे पहिला वहिला ब्रेकअप होतो तेव्हा मनाला जे हिंदोळे बसतात त्यातला एक हिंदोळा तुम्हाला समोर उभ्या असलेल्या तारुण्यात घेऊन जातो. 

तर असं हे के फाॅर कुमार आणि के फाॅर कल्याणचं कनेक्शन. 
कुमारच्या पौगंडावस्थेतील घटना कोणाच्या न कोणाच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने नक्की घडल्या असतील. हे पुस्तक वाचतांना तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असा.... 
तुमचं नॅास्टाल्जिक होणं सहाजिक आहे. आणि हेच या पुस्तकाचं यश आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.