शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिद्ध व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुद्धा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. ही विचारधारा मानणारे यदुनाथजी साने गुरुजींना गुरूस्थानी मानत. जवळपास तेहतीस वर्षे त्यांनी साधनाचे संपादन कार्य केले. सुरुवातीची आठ वर्षे सहसंपादक आणि नंतरची पंचवीस वर्षे मुख्य संपादक अशी त्यांची कारकीर्द होती.
आंतरभारती आणि राष्ट्र सेवा दल या संस्थांसाठीही त्यांनी बरेच काम केले असले तरी त्यांची प्रमुख ओळख 'साप्ताहिक साधनाचे संपादक' अशीच होती. त्यांनी लहानमोठी दीडएकशे पुस्तके लिहिली. त्यामध्ये विज्ञानविषयक पुस्तकांची संख्या लक्षणीय आहे.
साधना साप्ताहिकातली पत्रकारिता सांभाळून त्यांनी पुष्कळ लेखन केले. त्यांनी लिहिलेली डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीश्चंद्र बोस यांची चरित्रं खूप गाजली. ऑरिसन स्वेट मार्डेनच्या ‘पुशिंग टू दी फ्रंट’ या पुस्तकावर आधारित थत्ते यांनी लिहिलेली ‘पुढे व्हा’ ही तीन भागांतली पुस्तकमाला प्रचंड लोकप्रिय ठरली होती. साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत महात्मा गांधी, समर्थ व्हा, संपन्न व्हा, आपला मान आपला अभिमान, विनोबा भावे अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
( संकलीत)