प्रसिद्ध उर्दू लघुकथाकार. आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी गॉर्की, चेकॉव्ह, पुश्किन, ऑस्कर वाइल्ड व मोपासां यांचे ग्रंथ आवडीने वाचले. बारी अलीग नावाच्या कम्युनिस्ट इतिहासकाराने त्यांच्यात व्हिक्टर ह्यूगोबद्दलही गोडी निर्माण केली. त्यांच्याच प्रेरणेने मंटोंना सर गुझस्ते असीर या शीर्षकाने ह्यूगोच्या एका ग्रंथाचा उर्दू अनुवाद केला. ऑस्कर वाइल्डच्या वीरानामक ग्रंथाचादेखील उर्दूत अनुवाद केला आहे. गॉर्कीच्या काही कथाही मंटोंनी अनुवादिल्या.
एकांकिकांचे लेखनही मंटोंनी केले परंतु प्रामुख्याने ते लघुकथाकारच होते. समाजाच्या जवळजवळ सर्व स्तरांचे, विशेषतः वेश्यांच्या जीवनाचे, त्यांच्या मनोविश्वाचे सूक्ष्म निरीक्षण करून वेश्यांची जिवंत शब्दचित्रे त्यांनी रेखाटली. जातीय दंग्यांच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या कथांमध्येही एक निखळ कलाकार म्हणून त्यांचे दर्शन घडते. मंटोंच्या कथांतून नवनवीन वाक्प्रचार व अभिनव उपमांचा उपयोग केलेला आढळतो. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखाऱ्यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. फाळणीच्या वेदनांची धार कागदांवर शब्दांच्या रुपाने उतरवणारा सच्चा साहित्यिक होता सआदत हसन मंटो.