न. र. फाटक

नरहर रघुनाथ  फाटक 




: (१५ एप्रिल १८८३ – २१ डिसेंबर १९७९).

 नामवंत पत्रकार आणि प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार. विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि फरिश्ता’ ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले.. मराठी संताच्या वाङ्‍मयाचे आणि कार्याचे सामाजिक-ऐतिहासिक दृष्टिकोणांतून त्यांनी केलेले विश्लेषण आणि समालोचनही महत्त्वाचे आहे. सामाजिक- सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून फाटक साहित्याकडे पाहत. त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‍मयदृष्टी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी , श्री एकनाथ वाङ्‍मय आणि कार्य, ज्ञानेश्वर : वाङ्‍मय आणि कार्य, रामदास : वाङ्‍मय आणि कार्य ह्यांसारख्या त्यांच्या ग्रंथांतून प्रत्ययास येते. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या व्यासंगाचा आणि चिकित्सेचा एक विषय.




मराठेशाहीचा अभ्यास  आणि अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी  हे त्यांचे दोन प्रसिद्ध इतिहासग्रंथ होत.केवळ पाठ्यपुस्तकांवर भर न देता त्यांच्या अनुषंगाने विविध विषयांचा परामर्श घेऊन आपल्या विद्यार्थ्याना स्वतंत्रपणे विचार करावयास प्रवृत्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.



भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ अशा विविध संस्थांशी सदस्य वा पदाधिकारी ह्या नात्याने त्यांचा संबंध आला होता. १९४७ साली हैदराबाद येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 


( संदर्भ - मराठी विश्वकोश )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.