वि.आ.बुवा
( ४ जुलै १९२६ - १७ एप्रिल २०११ )
यांचे लेखन सुरू झाले ते प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने! ‘सोबत’ साप्ताहिकातून त्यांचा लेखनप्रवास सुरू झाला. ‘अकलेचे तारे’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. महाराष्ट्र ग्रंथ भांडारच्या शं.वा.कुलकर्णी यांनी काढलेला वि.आ.बुवा यांचेच साहित्य असलेला ‘बुवा’ हा दिवाळी अंक तुफान लोकप्रिय झाला.
विपुल प्रमाणात लिहिलेले त्यांचे लेखन प्रामुख्याने सामान्य वाचकांसाठी आहे. त्यामुळे सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्याच्या आशाआकांक्षा, त्याची सुखदुःखे, त्याच्या जीवनातील विसंगती यांचेच दर्शन त्यांच्या साहित्यातून होते. त्यांच्या साहित्याला अफाट लोकप्रियता लाभली. कित्येक दिवाळी अंक त्यांच्या लेखनाशिवाय वाचकांच्या पसंतीला उतरत नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाशी त्यांचे जवळचे नाते जुळले आहे. वि.आ.बुवा आणि विनोदी साहित्य असे समीकरणच मराठी वाचकांच्या मनात तयार झाले आहे. ही त्यांच्या साहित्याला वाचकांनी दिलेली पावतीच आहे.
१९७२ साली कल्याण येथे भरलेल्या साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. पंढरपूर, ठाणे, पुणे येथे त्यांचे सत्कार झाले. त्यांच्या ‘प्रेमाची एडडज स्टाइल’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी साहित्याचा पुरस्कार मिळाला.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक,डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर)