(२ मार्च १९३१-३ मे २००९).
सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते.लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. असोशी (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर रेघा(१९६७) आणि अंगारा (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. कवितेखेरीज त्यांनी अनेक निबंधही लिहिले.
अग्निमित्र (१९७६), अमृतझरा (१९७६), देवाचे दिवे (१९८९), रूचिभेद (१९८९)आणि सारस्वताचे झाड (१९८९), तारकांचे गाणे (१९९४) हे त्यांचे काही ललित निबंधसंग्रह होत. लोकनायक बापूजी अणे ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांनी लोकनायकांचे वाङ्मय स्वखर्चाने प्रकाशित केले, ही त्यांची एक विशेष उल्लेखनीय कामगिरी होय. त्यांनी संपादिलेल्या पुस्तकांत शिक्षणविचार (१९५५), यशोधन, त्रिविक्रम (३ खंड, १९९२) यांचा समावेश होतो. शिक्षणविचार मध्ये आचार्य विनोबाजी भावे ह्यांचे शिक्षणविषयक विचार आहेत. यशोधन मध्ये डॉ. य. खु. देशपांडे ह्यांचे संशोधनपर लेखन अंतर्भूत आहे. वा. ना. देशपांडे ह्यांचे स्फुटलेख त्रिविक्रम मध्ये आहेत.पाणियावरी मकरी (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र.
विदर्भ साहित्य संघाचे ते सतत नऊ वर्षे अध्यक्ष होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (उपाध्यक्ष) महाराष्ट्र साहित्य परिषद (उपाध्यक्ष) ह्या संस्थांचे ते पदाधिकारी होते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अशा शासकीय मंडळांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. १९९४ मध्ये पणजीत (गोवा) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत ‘ मॅन ऑफ द यिअर ’ पुरस्कार (१९९७) साहित्य धुरंधर पुरस्कार, बॉस्टन, अमेरिका (१९९७) दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमागज पुरस्कार (१९९९) मानद वाङ्मयपंडित (डी.लिट्.), नागपूर विदयापीठ (२००१) शिवाय अनेक मानपत्रे मिळाली.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)