( ७ जुन १९१३ - १९ एप्रिल २०१० )
‘अभिरुची’ या मासिकातून त्यांच्या लेखनाला प्रारंभ झाला. त्यात त्यांनी ‘वादसंवाद’ हे सदर ‘निषाद’ हे टोपणनाव घेऊन लिहिले. ‘पाच कवी’ हा १९४६ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ. यात आधुनिक कवितेचे अंतरंग त्यांनी उलगडून आधुनिक मराठी साहित्याची ऐतिहासिक उपपत्तीही मांडली आहे. आणि कवितेच्या बहिरंगामध्ये कसा बदल झाला हे स्पष्ट केले आहे.
त्यांचा ‘अम्लान’ हा समीक्षात्मक ग्रंथही मराठी समीक्षाव्यवहाराला वेगळी दृष्टी देणारा आहे. ‘खर्डेघाशी’ या पुस्तकातून साहित्यसृष्टीचे उपहासात्मक दर्शन त्यांनी घडविले आहे. संवेदनशीलता, रसिकता, चौफेर दृष्टी आणि प्रगल्भ विश्लेषण यांमुळे त्यांचे हे लेखन साहित्यसृष्टीच्या गुणदोषांवर नेमकेपणाने बोट ठेवते. ‘शब्दयात्रा’ हे त्यांचे साहित्यविषयक टिपणांचे पुस्तकही साहित्यविषयक जाणिवा समृद्ध करणारे आहे.
समीक्षात्मक लेखनाबरोबरच हलकेफुलके पण तेवढेच दर्जेदार असे लघुनिबंध व ललितलेखही त्यांनी लिहिले आहेत. ‘आकाशभाषिते’ , ‘पाक्षिकी’ , ‘पंचम’ , ‘शालजोडी’ ह्या त्यांच्या पुस्तकांचा वेध घेतला म्हणजे त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि प्रगल्भतेचे दर्शन घडते. ‘अभिरुची’ या मासिकातून राजाध्यक्ष, पु.ल. आणि अळूरकर या तिघांनी मिळून ‘पुरुषराज अळूरपांडे’ या आगळ्यावेगळ्या नावाने स्फुट लेखन केले आणि ते खूप गाजले. तीन लेखकांनी मिळून लेखन करण्याचा हा एक अभिनव प्रयोग साहित्यजगताला अनुभवायला मिळाला.लेखनाबरोबरच नॅशनल बुक ट्रस्ट, भारतीय ज्ञानपीठ निवड समिती, साहित्य अकाराजाध्यक्ष मराठी समिती, चित्रपट सल्लागार समिती इ समित्यांवर सभासद म्हणून कार्य केलेले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. ‘अम्लान’ या त्यांच्या ग्रंथास राज्यशासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक,)