: (१८ ऑक्टोबर १८६१–२० एप्रिल१९३८).
एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार. वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन ( सु. ५०,००० पृष्ठांचे) केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संगृहीत झाले. इंग्रजी (९) व मराठी (२०) अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे.
या ग्रंथांपैकी महाभारत : ए क्रिटिसिझम यावर लोकमान्यांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे आणखी एक अग्रलेख लिहून परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे.
मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून त्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे. वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया हा त्रिखंडात्मक ग्रंथ प्रथम इंग्रजीत लिहिला. आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद तीन खंडांत मध्ययुगीन भारत या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या आणि शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज हे दोन अन्य ग्रंथ होत. पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०८). भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)