रेव्हरंड टिळक आणि काव्य निर्मिती यांचे नाते अतूट असे होते. त्यांनी गद्यलेखन केलेले असले, तरी काव्यरचना हा त्यांचा स्थायीभाव होता. टिळकांची कविता भाग १ आणि भाग २ मध्ये संग्रहित केलेली आहे. त्याशिवाय त्यांनी ‘अभंगांजली’ निर्मिली.
गोल्डस्मिथच्या ‘डेझर्टेड व्हिलेज’वरून ‘माझा ओसाड पडलेला गाव’ रचले. भजने रचली. ख्रिस्त जयंती, वर्षप्रतिपदा ह्यांवर गीते केली. ‘ख्रिस्तायना’ची रचना करायला प्रारंभ केला. पण ‘ख्रिस्तायन’ काव्य म्हणून उभे राहण्यात कमी पडू लागले. अनेक वर्षांच्या परिश्रमांतून त्यांनी ११ अध्यायांची रचना कशीबशी पूर्ण केली आणि त्यांना मृत्यू आला. (लक्ष्मीबाईंनी ‘ख्रिस्तायन’ जवळपास पूर्ण केले तरी शेवटचा अध्याय त्यांचा मुलगा देवदत्त नारायण टिळक ह्यांनी रचला व ‘ख्रिस्तायन’ पूर्ण झाले.) ‘ब्रिटानिया’ हे खंडकाव्य, ‘शीलं परं भूषणम्’ ही नाटिका, ‘आनंदीबाई’, ‘आमच्या विधवा’ अशीही त्यांची आणखी रचना आहे. टिळकांच्या कवितेची भाषा साधीसुधी असली, तरी ती प्रसाद आणि माधुर्य ह्या गुणांनी ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या संस्कृतमधल्या व्यासंगाचा त्या कवितेवर प्रभाव आहे. अलौकिक प्रतिभा, मानुषता, सामाजिक सुधारणेची आंतरिक तळमळ ह्यांबरोबरच निसर्गावरचे उदंड प्रेम, स्त्रीबद्दलची उदार दृष्टी, प्रेमभावनेचा आत्मनिष्ठ आविष्कार, क्वचित गूढगुंजन अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतात. त्यांना ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता.त्यावेळी त्यांना रेव्हरंड ही उपाधी दिली गेली. पुढे ते रेव्हरंड टिळक या नावाने ओळखले गेले.
( संदर्भ - महाराष्ट्र नायक)