छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक अशी ख्याती होती. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती.
इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या.
शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते.. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले
( संदर्भ - विकिपीडिया)