आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे....
जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला ‘बालकवी’ हे नावही रूढ झाले.
बालकवींची विशेष ख्याती आहे ती निसर्गकवी म्हणून. किंबहुना त्यांच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती आहे.निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात.
पण बालकवी म्हणजे केवळ ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून’ घेण्याचा ध्यास लागलेले स्वप्नाळू, निरागस बालवृत्तीचे कवी नव्हेत. त्यांच्या उत्तर आयुष्यातील काही कवितांचा सूर अगदी निराळा आहे. बालभावाने बांधलेली आणि जोपासलेली स्वप्नसृष्टी काजळत आणि कोलमडत आहे या दुःखाची तडफड ‘कविबाळे’ ह्या कवितेत आहे. सृष्टीची खिन्न, उजाड रुपे त्यांच्या मनाला घेरताना दिसतात. ‘काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतर्हृदयाला’ अशी जीवघेणी अस्वस्थता त्यांना विफल करते कोठे मृत्यूची सावली तरळत असते. ‘ आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे’ म्हणून बागडणाऱ्या बालकवींइतकेच हे -त्यांच्या ‘पारव्या’ प्रमाणे खिन्न, नीरस एकांतगीत गाणारे-बालकवी खरे आहेत.
(संदर्भ - मराठी विश्वकोश)