अनंत काणेकर

अनंत आत्माराम काणेकर 


आधुनिक मराठी कवी, चतुरस्त्र लेखक व वृत्तपत्रकार. चांदरात व इतर कविता (१९३३) हा त्यांचा एकमेव काव्यसंग्रह. तत्कालीन काव्यसंकेतांना टाळून लिहिलेल्या त्यांच्या कवितांत प्रादेशिक लोकगीतांचे, विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेच्या प्रसन्न आविष्काराचे वैशिष्टयपूर्ण दर्शन घडते. 



पिकली पाने (१९३४) हा काणेकरांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. १९२५ पासून मराठीत अवतरलेला हा नवीन गद्य साहित्यप्रकार सुस्थिर व संपन्न करण्याचे कार्य फडके – खांडेकरांबरोबरच काणेकरांनीही केले. रुढ संकेतांना धक्के देणारी चतुर वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा हे त्यांच्या लघुनिबंधांचे विशेष गुण आहेत. मराठीतील प्रवासवर्णनांना काणेकरांनी वाङ्मयीन दर्जा प्राप्त करुन दिला. स्थलचित्रे, निसर्गचित्रे, व्यक्तिरेखा, प्रसंगचित्रे व समाजचित्रण यांनी संपन्न असलेल्या त्यांच्या प्रवासवर्णनांत त्यांच्या रसिक व बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. 


काणेकरांनी कथालेखनही केले आहे. मानवी स्वभावातील वैचित्र्याचे वास्तव दर्शन त्यांच्या कथांतून घडते. रुपेरी वाळूमधील (१९४७) रुपककथा नावीन्यपूर्ण व परिणामकारक आहेत. यांशिवाय राखेंतले निखारे (१९४१), हिरवे कंदील (१९४४) व बोलका ढलपा (१९५९) या पुस्तकांत त्यांचे टीकात्मक व अन्य प्रकारचे लेखन आढळते. रसेलनीती (१९४१) व समाजवादाचा फेरविचार (१९४५) ही त्यांची अनुवादित पुस्तके आहेत. औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे (१९५७) ते अध्यक्ष होते.  साहित्य अकादेमीचे व संगीत नाटक अकादेमीचे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. १९६५ साली पद्मश्री होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. १९७१ मध्ये सोव्हिएट देश नेहरु पारितोषिकाचे ते मानकरी ठरले. 

( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.