(२० एप्रिल १८९६ - ९ जुलै १९६८).
महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त, श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली (१९५६). सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन हे सोनोपंतांचे महत्त्वाचे योगदान होय. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना स्वतंत्र ग्रंथाच्या तोडीची आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या समितीने ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती तयार केली. तिला सोनोपंतांची १५० पानांची प्रस्तावना असून ती सोनोपंतांची ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या शेवटी कठीण शब्दांचा कोश सुलभ अर्थाद्वारे (सोपपत्तिक) जोडला आहे. त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच अनेक ग्रंथांचे संपादनही केले.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)