कविता, कथा, कादंबरी, बालसाहित्य, असे विविध साहित्यप्रकार हाताळले. शालेय जीवनापासून कवितालेखनाने त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या ‘विसर्जन’ या प्रदीर्घ विरहगीतातून त्यांच्या काव्यलेखनावर रविकिरण मंडळाचा विशेष प्रभाव जाणवतो. नवथर प्रेमातील कोवळीक, संसाराच्या माध्यान्हीला अनुभवायला येणारी तृप्ती आणि प्रगल्भता, आणि आयुष्याच्या उत्तरकाळात विरक्तीकडे झुकलेली वृत्ती त्यांच्या कवितेमधून प्रकट होते. प्रेमाचे उदात्तीकरण, मातृत्वाचा गौरव, ईश्वरनिष्ठा आणि निखळ निसर्ग-प्रतिमा हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते.
ईश्वरावरच्या निस्सीम भक्तीमुळे त्यांनी ‘प्रसादरामायण’ हा रामाचे चरित्र सांगणारा गीतसंग्रह लिहिला. समाजातील दैन्य, शोषण यांमुळे येणारी अस्वस्थता, यातून येणारी असाहाय्यतेची भावना त्यांच्या ‘लमाणांचा तांडा’, ‘अणुस्फोट’, ‘वेसण’, ‘भट्टी’ यांसारख्या निवडक कवितांमधून व्यक्त झाली आहे. मुलांविषयी वाटणारे प्रेम आणि त्यांच्या भावविश्वाशी एकरूप होऊन जगाकडे पाहायची दृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे मुलांचा व्रात्यपणा, त्यामागचा निरागसपणा ते नेमकेपणाने आपल्या बालसाहित्यात मांडू शकले आहेत. ‘रंगपंचमी’, ‘गाडी आली झुक झुक झुक’, ‘नवी स्फूर्तिगीते’ हे बालगीतसंग्रह. ‘न्याहारी’ हा कथासंग्रह. ग्रामजीवनावर आधारित ‘आहुती’ ही कादंबरी. ‘साहित्यदर्शन’, ‘वृत्ते व अलंकार’, ‘रामजोशीकृत लावण्या’ (संपादन), ‘मुक्तेश्वरकृत सभापर्व’ (संपादन) ही त्यांची इतर काही पुस्तके. (संदर्भ - महाराष्ट्र नायक)