लेखक - डॉ. अनिल गांधी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
व्यावसायिकता आणि जगण्यातील ताणतणाव आणि गरीबीशी संघर्ष करून मोठा होता येतं आणि निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तमतेची उंची वाढवता येते हे दर्शवणारं एका डाॅक्टरांचं आत्मकथन.
अगदी लहानपणी, शालेय शिक्षण चालू असतांनाच डाॅक्टर होण्याचं ध्येय बाळगलेलं असतांना कुटुंबात आलेल्या आर्थिक अस्थिरतेपुढेही हतबल न होता स्वप्नपूर्ती च्या दिशेने वाटचाल करीत राहिले.
मुलीच्या लग्नासाठी वडिलांना कर्ज घ्यावे लागले. अगोदरच बेताची आवक असतांना कर्जाचे हप्ते चुकवतांना आर्थिक घडी बिघडत असतांना फक्त कर्ज चुकवण्यासाठी जुगारात अडकून स्वतःची वाताहत करून घेतली होती. मग शिक्षण चालू असतांना इकडे तिकडे काम करून कौटुंबिक जबाबदारी पुर्ण करीत वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले. पुढे प्रॅक्टिस सुरू केल्यावर हळूहळू वडिलांचे आणि दरम्यान च्या काळात मित्रांकडून घेतलेले सगळे कर्ज परत केले. काही संस्था वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यास परतफेडीच्या बोलीवर आर्थिक मदत द्यायच्या. बहुतांश जणांकडून परतफेड व्हायची नाही. परंतु डॉ अनिल गांधीनी या कर्जाची एक रकमी परतफेड करून सामाजिक कृतज्ञतेची जाणीव ठेवली. शिवाय पुढे आर्थिक स्थिरता आल्यावर अनेकांना मदत केली. ज्यांनी कोणी त्यांना मदत केली होती अशा सगळ्यांना व शिक्षकांना वैद्यकीय सेवा देतांना फी घेतली तर नाही, जर दवाखान्यात एडमिट व्हायची वेळ आली तर फक्त जी औषधांचेच पैसे घेतले. अनेक संस्थाशी संलग्न राहून, सामाजिक संस्था उभारून तळागाळातील आर्थिक दुर्बलांसाठी, आदिवासीसांठी वैद्यकीय सेवा दिली.
साठी सत्तरीच्या दशकात वैद्यकीय सेवा आज सारख्या प्रगत नसतांना, रोग निदान करतांना, एखाद्या जवळच्या व्यक्तिला काही असाध्य रोग झाला तर ते सांगताना मनाची होणारी उलाघाल,तसेच गंभीर रुग्णांसाठी प्रसंगी धोका पत्करुन योग्य ते निर्णय घेऊन रुग्णांना जीवनदान देता आले तेव्हा मिळणारं समाधान हे कशाचीही बरोबरी करु शकत नाही. एका मित्राने गरोदर पत्नीला तपासण्यासाठी घरी बोलवलं तेव्हा तिची गंभीर परिस्थिती बघून घरीच सिझेरियन करण्याची तयारी केली होती. अशा अनेक वेगवेगळ्या गंभीर परिस्थितीचाही सामना करावा लागला होता. काही मजेदार गमतीशीर प्रसंगही ते सांगतात.
मुलगा बॅडमिंटन चागलं खेळतो हे मित्राने सांगीतल्यावर योग्य प्रशिक्षण मिळवण्याची खटपट करतांना प्रसिद्ध उद्योगपती मित्तल यांनी विदेशात केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करतात.
वडिलांना लागलेलं जुगाराचं व्यसन जसं लपवत नाही, त्याचप्रमाणे धाकट्या भावाचा नाकर्तेपणाही न लपवता सांगतांना निवेदनातल्या प्रामाणिकपणा जाणवतो. डाॅक्टरी व्यवसायामुळे अनेक सुखदु:खाच्या प्रसंगी उपस्थित राहता आलं नाही, कुटुंबाला वेळ देता आला नाही याचीही खंत व्यक्त करतात.
आर्थिक स्थिरतेनंतर आर्थिक सुबत्ता आल्यावर आपण समाजाचं देणं लागतो या भावनेने अनेक समाजपयोगी कामे केली. सामाजिक संस्था उभ्या करुन आर्थिक मदत केली.
शेवटी वैद्यकीय सेवेतील चांगल्या वाईट चालीरीतीचांही आढावा घेतला. एकेकाळी डाॅक्टरांना देव मानलं जात असे. पुढे त्याचा देवमाणूस झाला. त्याही पुढे जाऊन अध:पतन होत होत माणूस या पायरीच्या खाली जात तो "अमानुष" झाला.
याचे डॉ. अनिल गांधी आपल्या परीने विश्लेषण करतात.
एकंदरीत प्रामाणिकपणे आपले आयुष्य सांगणारे डाॅ. गांधी या पुस्तकाचे श्रेय जेष्ठ साहित्यिक आनंद यादव, चित्रलेखा पुरंदरे, मेहता पब्लिशिंग चे अनिल मेहता यांना देतात. आनंद यादव, अनिल मेहता तर काॅलेजमधील सहध्यायी होते.