(२५ मे १८९५-२८ नोव्हेंबर १९६३).
मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक व इतिहासकार. शेजवलकरांनी इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांत पुढील मोजकीच पुस्तके लिहिली. मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्र लिहिण्याचे काम सोपविले होते (१९५८). अखेरपर्यंत ते या कामात व्यग्र होते परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचे शिवचरित्र पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेने त्यांनी लिहून ठेवलेली संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना (काही भाग), लेख, टिपणे, चरित्राचा आराखडा, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, कौटुंबिक माहिती इ. साहित्य श्री शिवछत्रपति : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने या शीर्षकाखाली प्रसिद्घ केले (१९६४). या गंथावरून शेजवलकरांचा प्रदीर्घ व्यासंग, स्वतंत्र प्रज्ञा आणि निर्भीड ऐतिहासिक दृष्टिकोन यांचे प्रत्यंतर येते. हे अपूर्ण शिवचरित्र पुढील पिढीस एक अत्यंत विश्वसनीय असा संदर्भगंथ ठरले आहे. या गंथासाठी शेजवलकरांना ‘ साहित्य अकादमी पुरस्कारा ’चा (मरणोत्तर) बहुमान मिळाला. या गंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, गौरवगंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले. यांपैकी काही लेख, त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह या नावाने ह. वि. मोटे यांनी प्रसिद्घ केले आहेत (१९७७). त्यांनी केलेली काही गंथपरीक्षणे त्यांच्या मर्मभेदक व स्वतंत्र समीक्षादृष्टीची निदर्शक आहेत.
त्यांचे पानिपत व शिवचरित्र … साधने हे दोन गंथ विशेष मान्यता पावले. पानिपत हा गंथ शेजवलकरांनी जदुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायकारक टीका, याला उत्तर म्हणून लिहिला. विविध प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची सूक्ष्म चिकित्सा, नकाशांचा सूक्ष्म अभ्यास, प्रत्यक्ष भेटी देऊन भौगालिक स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण, आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा गंथ लिहिला आहे. इतिहास-संशोधनपद्धतीत या गंथाने एक उच्च् मानदंड निर्माण केला आहे. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण, चिकित्सक, विचारप्रवर्तक, अन्वयार्थी आणि बहुआयामी आहे.
( संकलित)