स. अ. शुक्ल

सदाशिव अनंत शुक्ल 


( २६ मे १९०२ - २७ जानेवारी १९६८ ) 

साहित्याच्या कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा विविध क्षेत्रांत सदाशिव अनंत शुक्ल सुमारे चाळीस वर्षे कार्यरत होते. ‘भरारी’ (१९३७), ‘कागदी बदाम’ (१९४२), ‘आठवा सर्ग आणि इतर लघुकथा’ (१९४६) आणि ‘असत्याचे प्रयोग’ (१९५९) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘कमलेची कहाणी’ या कादंबरीव्यतिरिक्त त्यांनी ‘तीन आणे माला’मधून लघुकादंबर्‍या लिहिल्या.    प्रचलित, राजकीय व सामाजिक विचारांचा धागा गुंफण्याची प्रवृत्ती शुक्लांच्या पौराणिक नाटकांत दिसते. दैवी चमत्कारांचा आश्रय घेतल्याने, ‘नाट्यरूप प्रयत्नातली परिणामकारकता कमी झालेली आहे’ असे श्री.अ.ना. देशपांडे यांनी म्हटले आहे. शालेय जगतातल्या त्यांच्या काही (‘जंगल्या भिल्ल’, ‘नवलनगरची राजकन्या’) नाटकांनी रमविले यात शंका नाही. 



जातिभेद नष्ट करण्याची जरुरी पटविण्यासाठी शुक्लांनी ‘झुणका भाकर’सारखी प्रचारकी स्वरूपाची नाटिका लिहिली.  शुक्ल यांनी जॉन स्टाइनबेकच्या ‘द मून इज डाउन’ या कादंबरीचा ‘नवी राजवट’ हा अनुवाद केला होता.‘कुमुदबांधव’ या टोपणनावाने कविता लेखनास आरंभ करणार्‍या सदाशिव अनंत शुक्लांनी ‘प्रेम मरता काय उरले हाय संसारी आता’ असे उद्गार काढूनही, ‘देशभक्त मोक्षदाता मंत्र वंदे मातरम्। हिंदवीरा सत्त्वधीरा! बोल वंदे मातरम्॥’, असा अमोल व प्रेरक मंत्र जनतेला दिला. 


( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.