साक्षी

पुस्तकाचे नाव -  साक्षी
लेखक - एस एल भैरप्पा
अनुवाद - उमा कुलकर्णी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस




खोटं बोलणं हा मानवाची मुलभूत वृत्ती असते. काही जण तर सराईतपणे अगदी खरं वाटावं असं खोटं बोलण्यात पटाईत असतात. हरिश्चंद्र किंवा रामासारखे सत्यवचनी अत्यंत विरळा. 

वयाच्या साठीत परमेश्वरय्याने कोर्टात मंजय्याच्या बाजूने शपथेवर खोटी साक्ष दिली. खूनाच्या आरोपातून मंजय्या सुटला पण परमेश्वरय्याचं पापभिरू देवभोळं मन त्याला खाऊ लागलं. शेवटी ही बोच असह्य होऊन परमेश्वरय्याने आत्महत्या करून जीवन संपवलं. 

यमधर्माच्या दरबारात चित्रगुप्ताच्या उपस्थितीत परमेश्वरय्याने खोटी साक्ष देण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली. 
मंजय्या त्यांचा सगळ्यात धाकट्या मुलीचा पती होता. पण त्याचा बाहेरख्याली पणाला कंटाळून ती नवऱ्याला सोडून आली होती. सासरेबुवांच्या साक्षीमुळे तो सुटला तर तर सगळी लफडी सोडून तो बायकोला नांदवायला घेऊन जाणार होता. 
मोठ्या जावयानेही समजावलं होतं. मुलीच्या संसाराचा विचार करून त्यांनी खोटी साक्ष दिली होती. ते बोलत असताना चित्रगुप्ताने मध्ये अडवलं नाही म्हणजे ते खरं बोलत होते. हे एकमेव पाप, खरं तर मुलीच्या संसारासाठी खोटं बोलल्यावर त्यांच्या संपूर्ण पूर्वायुष्याचा आढावा घेऊन यमधर्माने त्यांना एक संधी द्यायचं ठरवलं. 

तू देह विरहित स्थितीत पुन्हा भूलोकात जाशील. तिथे तू कुणाच्याही मनात प्रवेश करू शकशील. एकाच वेळी अनेकांच्या मनात शिरून तुला पाहता येईल, पण कुणाचंही मन प्रभावित किंवा परिवर्तित करण्याची शक्ती तुझ्यात असणार नाही. साक्षीदाराला फक्त जाणून घ्यायचीच शक्ती असेल. तुझं अस्तित्व तिथल्या कोणालाही समजणार नाही त्यामुळे तुला भय, संकोच, अवघडले पण याचा स्पर्श होऊ शकणार नाही. 

सुक्ष्म देहाने परमेश्वरय्या परत भुलोकी आल्यावर मग एकेकाचं आयुष्य उलगडायला लागतं. 

मंजय्या निर्दोष सुटला. पण त्याने बायकोला सोबत नेलं नव्हतं, त्याचा बाहेरख्याली पणा  तसूभरही कमी झाला नव्हता.

परमेश्वरय्याचा मुलाचा मुलगा आजोळी शिकण्यासाठी होता.  त्याच्यावर होत असलेल्या खर्चाची चर्चा सासरेबुवा येणाऱ्या जाणाऱ्यांकडे करतात हे समजल्यावर हिशैबापेक्षा जास्त पैसे देऊन मुलाला बोलवून घेतलं. सासरेबुवा वारले तेव्हा घरात सापडलेली सहा लाखाची रोकड त्याने जळत्या चितेत टाकली होती. पण मागे राहिलेल्या इस्टेटीची हाव त्याच्या बायकोला सुटत नव्हती. 
 
मोठ्या लेकीचं लग्न करून दिल्यावर ती लवकर वारली. जावयाला  विरक्ती आल्यासारखे वाटायचं. मुलगा मोठा झाला, नातवंड आली. पण या वयातही शरीरभोगाची आसक्ती कधी कधी असहनीय व्हायची. एकदा मंजय्याची गाठ पडल्यावर मंजय्याने त्यांना आपल्या शेतातल्या घरी पाठवून एक स्री त्यांच्या साठी पाठवून दिली होती. घाबरत घाबरत का होईना, त्यांनी देह तृप्त करून घेतला. 

मंजय्या आता राजरोस लक्कू सोबत राहत होता. ज्याचा खून मंजय्याने केला होता. त्याची बायको. मुलगी शिक्षणासाठी शहरात राहत होती. 

एका दिवशी लक्कू रक्ताळलेला कोयता घेऊन मंजय्याच्या छाटलेल्या अवयवासह पोलीस चौकीत हजर झाली मंजय्याचा खून झाला होता. 

अशा आपल्या कुटु़बातील अनेकांचं अंतरंग जाणून घेऊन ठराविक कालखंड संपल्यानंतर परमेश्वरय्या यमधर्माच्या दरबारात हजर झाले. विचारले, 
"प्रभू, असत्याचं मुळ कोणतं? त्याला अंत नाही का. .? "

ही कादंबरी वाचनीय तर आहेच, शिवाय चिंतनीय सुध्दा आहे. धर्म, अर्थ आणि काम यातील कशाचीही अतिरेक झाला तर  कौटुंबिक व सामाजिक पातळीवरील जीवनही ढवळून निघते. 



 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.