नेहरू




एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला.

लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात,पडखाऊ म्हणतात.त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात,पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशात रेशनिंग होती व माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई.
४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर हा देशही टिकु शकत नाही, इथली लोकशाही ही टिकू शकत नाही.
आणि चीनकडून होणारा अपमान तर सोडाच, पण श्रीलंकेनं एखाद्या वेळी उद्धटपणे आपला अपमान केला, तर त्याचा प्रतिकारही करणे शक्य होत नाही. 

पाकिस्तान च्या डरकाळ्यांच्या मागे पश्चिम पंजाबचा गहू व कापूस आणि आजच्या बांगलादेशमधले ताग व तांदूळ असल्याची ग्वाही  खुद्द अमेरिका देते.

नेहरू वारले, तेव्हा आपल्या अन्नधान्यात पुष्कळशी वाढ झाली होती. १९६८ नंतर आपण १०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त धान्याचं उत्पादन करु लागलो. लोकसंख्या दुप्पट होण्याच्या आधी आपण अन्नधान्याचं उत्पादन दुप्पट करु शकल्यामुळे देशातल्या लोकांना पुरेसे अन्न आपण देशातच तयार करु शकतो.

नेहरुंच्या पेक्षा शास्त्री धीटपणे वागू शकले व शास्त्रींपेक्षा इंदिरा गांधी जास्त धाडसीपणे पावले टाकु शकल्या, कारण नेहरुंनी सर्वांच्या शिव्या खात १९५० पासून जे घडवत आणले त्याची फळं दोन दशकांनंतर हा देश उपभोगत आला. पण हा उपभोग घेताना नेहरुंना शिव्या द्यायचा उद्योग मात्र संपला नाही.


शुन्यातून उभारणी करणाऱ्या पंतप्रधानांचा काळ हा शिव्या खाण्यातच जातो, तो योग नेहरूंचा होता याला इलाज नाही. 


आधुनिकीकरण ही एक चमत्कारिक बाब असते.आज धरण बांधायला घेतले म्हणजे १०वर्षांनी त्याच्या पाण्याचा उपयोग होऊ लागतो, या पाण्यावरील शेतीशी शेतकऱ्यांची तडजोड होण्यास दोन चार वर्षे जाऊं लागतात मग उत्पादन वाढू लागते . १५ वर्षांनी नफा देणारा आणि आरंभी कोट्यवधीचे भांडवल मागणारा उद्योगधंदा खाजगी उद्योजकाने उभारणे शक्यच नाही म्हणून शासनाला देशाच्या मुलभूत उभारणीत मध्यवर्ती वाटा उचलणे भाग होते . सामाजिक सोडा, प्रामाणिक राष्ट्रवादी भुमिकेलाही याशिवाय दुसरा मार्ग स्वीकारणे शक्य नव्हते. नेहरुंच्या या धडपडीमुळे आपण स्टील उत्पादन ५/६ पट वाढवू शकलो. कोळशाचे उत्पादन अडीच पटीने वाढले, अल्युमीनियम नसल्यात जमा होते ते कैक पटीने वाढले, स्वातंत्र्याच्या जन्मवेळी आम्ही ६०० टन शिसे तयार करीत होतो ते चोवीस हजार टनापर्यंत गेले. पाकिस्तान विरुद्ध शास्री लढले, इंदिरा गांधी ही लढल्या, पण देशात रणगाड्यांचे कारखाने, विमानांचे कारखाने १९५३ साली, स्वयंचलित शस्रांचे कारखाने १९५५ साली सुरू झाले, शस्रांचे प्रचंड असे उत्पादन १९६७ पासून हाती पडु लागले म्हणून जगाच्या धमक्या नजरेआड करून आपण दोन महिने लढू शकलो. हा सर्व शस्रसाठा शातंतेची कबुतरे उडवणार्या शेळपट म्हणून हिणवल्या गेलेल्या पंतप्रधानांने उभारलेल्या कारखान्यांचा आहे. 

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आमच्या जवळ रेल्वेची इंजिने नव्हती, जहाजे नव्हती. आधुनिक जगात ज्या शक्तीवर राष्ट्रे स्वाभिमानाने जगतात ज्या पायाभरणीमुळे राष्ट्रांना स्वत्व टिकवणे शक्य होते, किंबहुना राष्ट्रांना त्यांच्या राष्ट्रपणाचा दर्जा येतो ती पायाभरणी नेहरुंनी केली.  


संदर्भ - वाटा तुझ्या माझ्या, नरहर कुरुंदकर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.