नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध साहित्यप्रकार हाताळले. इतकेच नव्हे तर त्यांची ओळख रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशी देखील होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाचा साहित्यप्रकार म्हणजे गूढकथा. मराठी साहित्यात भय आणि गूढकथेचे गारुड मतकरी यांनी निर्माण केले.
साहित्यात जरी त्यांचे प्रमुख योगदान गुढकथेच्या प्रांतातले मानले जात असले तरी त्यांनी तेथेही अगदी बालवाङ्मयापासून समिक्षेपर्यंतचा मोठा लेखनपट साकारला. गुढकथांसोबतच त्यांनी ‘जौळ’सारखे समाजप्रबोधनात्मक, तर ‘ॲडम’सारखे तत्कालीन मानवी नैतिकतेला धक्का देणारे कादंबरी लेखनही केले.
नाट्यक्षेत्रातही त्यांच्या बालनाट्यचळवळीविषयी मोठ्या प्रमाणात बोलले जात असले तरी तिथेही त्यांच्या बहुपल्ली कारकिर्दीचे दर्शन होते. बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन केले.त्यांना अनेक पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य शासनाचे व इतर मिळून, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
( संकलीत)