महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी इतिहासकार. बडोदयास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून सेवेत असतांना सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला.
त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली (१८९८).याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स व प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.या नंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले आणि इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला.त्याचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालकमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले.
मराठी रियासत व ब्रिटिश रियासत या दोन रियासतींच्या खंडांच्या आवृत्त्या १९३५ पर्यंत निघाल्या. रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक व बालोपयोगी भारतवर्ष, महाराष्ट्राचा इतिहास, इतिहासाच्या सोप्या गोष्टी, हिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. त्यांनी काव्येतिहाससंग्रहा तील पत्रे, यादया आणि भारतवर्ष व इतिहास संग्रह या नियतकालिकांतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे संपादनही केले आहे. शिवाय परमानंदाच्या अनुपुराणा चे संपादन करून ‘गायकवाड ओरिएंटल सेरीज’मध्ये ते प्रसिद्ध केले.अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले. सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. पुणे विदयापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली (१९५१). त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला (१९५७).
( संदर्भ - मराठी विश्वकोश)