(९ ऑक्टोबर १८७६ – ४ जून १९४७).
बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित. १८९७ मध्ये एका मराठी नियतकालिकातील गौतम बुद्धावरील लेख वाचून, त्यांचे बौद्ध धर्माविषयी कुतूहल जागृत झाले. त्यासाठी संस्कृतचा अभ्यास करावा म्हणून १८९९ मध्ये त्यांनी घर सोडले व पुणे, ग्वाल्हेर, काशी येथे जाऊन संस्कृतचा अभ्यास केला. काशीत तर अन्नछत्रात केवळ एक वेळ भोजन करून त्यांनी अध्ययन केले. पुढे ते नेपाळला गेले परंतु तेथील बौद्ध धर्माची अवनती पाहून ते गयेस परतले.
हार्व्हर्ड विद्यापीठातील प्रा. जे. एच्. वुड्स ह्यांच्या निमंत्रणावरून चार वेळा अमेरिकेत जाऊन, त्यांनी बुद्धघोषाच्या विसुद्धिमग्ग या पालिग्रंथाचे संपादन केले. कलकत्ता विद्यापीठ फर्ग्युसन कॉलेज, पुणे (१९१२ – १८) मुंबई विद्यापीठ लेनिनग्राड (रशिया, १९२९ – ३०) इ. ठिकाणी त्यांनी पालीचे अध्ययन केले. बौद्ध धर्म तत्वज्ञानाप्रसारार्थ अनेक मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले. ‘आनंदविहार’ आणि ‘बहुजनविहार’ ह्या संस्थाही त्यांनी मुंबईत स्थापिल्या. विसुद्धिमग्ग हा महापूर्ण ग्रंथ त्यांनी प्रथम रोमन लिपीत १९२७ मध्येच तयार केला तथापि तो प्रसिद्ध मात्र १९५० मध्ये झाला. १९४० मध्ये त्यांनी तो देवनागरीतही संपादून प्रकाशित केला. निवेदन (आत्मचरित्रपर), समाधिमार्ग , बौद्ध संघाचा परिचय , भगवान बुद्ध , बोधिसत्त्व, सुत्तनिपाताचे मराठी भाषांतर , पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म हे त्यांचे उल्लेखनीय मराठी ग्रंथ होत.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)