(१० जानेवारी १९०१ - ५ जून १९८५ ).
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. इतिहासाचा सर्वांगीण अभ्यास आणि संशोधन करता यावे, म्हणून त्यांनी हिंदी, उर्दू, फार्सी, कन्नड, संस्कृत, इंग्रजी वगैरे भाषांचा सखोल अभ्यास केला; तसेच इतिहासाशी संबंधित अशा नाणकशास्त्र, पुरातत्त्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या यांचा अभ्यास केला.
सर्व भारतभर प्रवास करून त्यांनी शेकडो ऐतिहासिक स्थळे तर पाहिलीच; पण नाणी, कागदपत्रे, पोथ्या व इतर ऐतिहासिक वस्तू जमा केल्या. सु. तीस इतिहासप्रसिद्ध घराण्यांचे कागद, २०,००० पोथ्या, ५,००० नाणी, ८० चित्रे, ३० ताम्रशासने व २०० इतर वस्तू एवढे प्रचंड साहित्य त्यांनी जमा केले. या सर्वांचा उपयोग सामान्य विद्यार्थ्याला तसेच चिकित्सक संशोधकाला व्हावा, म्हणून त्यांवर त्यांनी सु. ४०० लेख आणि पन्नासहून अधिक लहान-मोठी पुस्तके लिहिली.
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने, (३ खंड – १९३०, ३४, ४९), मूर्तिविज्ञान (१९३९), संशोधकांचा मित्र (१९५१), महाराष्ट्राची चार दैवते (१९५८) ही त्यांची मान्यवर व प्रसिद्ध पुस्तके उल्लेखनीय आहेत.
अखिल भारतीय नाणक-परिषदेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले (१९७४). तसेच त्यांचा एक गौरवग्रंथही प्रसिद्ध झाला आहे (१९७५). पुणे विद्यापीठाकडून सन्माननीय डी. लिट्. पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला (१९८४). महाराष्ट्रात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी निष्ठावंत इतिहाससंशोधकांची जी परंपरा निर्माण केली, त्याच परंपरेत खरे मोडतात.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)