लेखक - जेफ्री ऑर्चर
अनुवाद - सुभाष जोशी.
ज्यांचे स्वप्न एव्हरेस्ट आहे ते सगळेच जाॅर्ज मेलरीला आपले दैवत मानतात. हिमालयीन गिऱ्यारोहकांमधे जाॅर्ज मेलरीला आद्य गिऱ्यारोहक मानले जाते. त्याची ही गोष्ट.
उंच उंच डोंगर, आल्प्समधील पर्वत त्याला साद घालायचे. तो ही लिलया त्यांच्या शिखरांना कुरवाळायचा. मानवाने न स्पर्शलेलं एव्हरेस्ट शिखर त्याचं स्वप्न होतं.तिथे त्याला पावलं रोवायचा होती.
शाळेत असतांना गिऱ्याररोहकांचा चमू शाळेतर्फे स्काॅटलंडला पाठवण्यात येणार होता. सगळ्यात पहिलं नाव मेलरीने नोंदवलं. स्कॉटलंड मधला सर्वात उंच डोंगर ४४०९ फुट चढाई करायची होती. पहिल्या एक मैलाची वाटचाल केल्यावर विसरलेली शिट्टी आणण्यासाठी मेलरी परत आला. धावत जाऊनही सगळ्यात मागे राहीला होता. त्याच्या सोबत्यांनी चढाईला सुरूवात केली होती. त्यांना सोडून मेलरीने वेगळ्या वाटेने चढाई केली. तो मध्यावर पोहोचल्यावर जवळपास तासाभराने त्याचे सोबती तिथे पोहोचले.
काॅलेजमध्ये असतांना फ्रान्सला सहल गेलेली असतांना प्रेयसीला प्रभावीत करण्यासाठी आयफेल टाॅवरवर बाहेरच्या बाजूने चढाई केली. नंतर पोलीसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागल्या होत्या.
पुढे एव्हरेस्ट शिखराच्या वाटा शोधण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२२ साली आयोजित केलेल्या मोहिमेत जॉर्ज मेलरीचा समावेश करण्यात आला. पण खराब हवामानामुळे मोहीम अर्धवट सोडावी लागली. त्यानंतर फक्त दिड वर्षाच्या अंतराने दुसरी मोहीम आखली गेली आणि नेतृत्व दिले गेले जाॅर्ज मेलरीकडे.
पहिल्या अपयशी मोहिमेत जीवघेण्या वातावरणाचा, बर्फाळ वाऱ्यासह हिमदंश करणाऱ्या उणे तीस अंश थंडीचा, सामना करावा लागला होता. तसेच उंचावर विरळ असलेल्या प्राणवायूमुळे गिऱ्यारोहकांचा जीव धोक्यात पडतो हे सिद्ध झाले होते म्हणून ऑक्सिजन सिलेंडर ची चर्चा झाली. अगदीच गरज पडली तर ऑक्सिजन सिलेंडर वापरायचे ठरले.
या दोन्ही मोहिमांचे थरारक वर्णन अंगावर काटा आणते. आज एव्हरेस्ट शिखर तेवढे दुर्लभ राहिलेलं नाही. आज अनेक व्यवसायीक संस्था चढाईचे नियोजन व मार्गदर्शन करतात. सगळ्या संस्था मिळून खोल घळ्यांवर पुल, कडा चढून जाण्यासाठी शिड्या अशा सोयी करून ठेवतात. कोणीही त्याचा उपयोग करू शकतो.
शंभर वर्षांपूर्वी असं काहीही नव्हतं. त्या बर्फाच्छादित भूभागावर प्रथमच मानवी पाऊले पडत होती. पुढे दरड आहे की काय याची माहिती नव्हती. खोल घळ्या कोणाचाही घास घेण्यास टपून बसलेल्या होत्या. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ते वाटचाल करीत होते. आणि वातावरण जणू मानवी क्षमतांची परीक्षा घेत होतं.
शिखरापासून दोन हजार फूट अंतरावर अगोदर जाॅर्ज मेलरी आणि त्याचा तरूण सहकारी आयर्विन ने पुढे जायचे ठरले. चढाईला सुरूवात केल्यावर हळूहळू ते नजरेच्या टप्याबाहेर गेले. नंतर मात्र बेपत्ता झाले. परत कधीही न भेटण्यासाठी.
जाॅर्ज मेलरीने पत्नीला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की चोमुलंग्माला (एव्हरेस्ट)मी तुझी ओळख करून करून देईल, तुझा फोटो दाखवून. त्याची पत्नी एव्हरेस्टला स्वत:ची सवत समजायची.
पण १९९९ साली त्याचं प्रेत शिखरापासून दिड हजार फुटावर सापडले.त्याच्याकडे असलेल्या सामानात त्याच्या पत्नीचा फोटो सापडला नाही.
१९५३ साली एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्टवर अधिकृत यशस्वी चढाई केली.