वीरधवल

पुस्तकाचे नाव - वीरधवल
लेखक - नाथमाधव
प्रकाशक - समन्वय प्रकाशन




रहस्यमय, गुढ, थरारक, अदभुत रम्य वाड्मयीन प्रकारात पहिला उल्लेख होतो तो शतकापूर्वी प्रकाशित झालेल्या नाथमाधव यांनी लिहिलेल्या वीरधवल या कादंबरीचा. १९१३ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा लोकप्रियता आजही तेवढ्याच उच्च स्तरावर आहे. नंतर गो. ना. दातारशास्रींनी शालिवाहन शक, कालिका मुर्ती, इंद्रभुवन गुहा अशा कादंबऱ्यांतून वाचकांना आकर्षीत केले. तर ऐंशी नव्वद च्या दशकात शशी भागवतांच्या मर्मभेद, रत्नप्रतिमा, रक्तरेखा या 
थरारक अदभुत कादंबऱ्यावर वाचकांच्या उड्या पडल्या. 

दरम्यानच्या काळात अशा अदभुत कथा प्रकारचे सहित्य केव्हा आले केव्हा गेले हे ही समजले नाही. कारण कुठे थरार कमी झाला, कधी वातावरण निर्मिती परिणामकारक झाली नाही, तर कधी रहस्य वाचकाला खिळवून ठेऊ शकले नाही. हे अत्यंत अवजड शिवधनुष्य असते. प्रत्येकाला तोलवेलच असे नाही. 

म्हणूनच अदभुत कथा प्रकारात नाथमाधव लिखित वीरधवल  कादंबरी अत्यंत महत्वाची ठरते. 

महाराष्ट्र दख्खन प्रदेशात राजमहेंद्री या राजधानीत या कथानकाची सुरूवात होते. कथानकातील गुंतागुंत, अनपेक्षित नाट्यमयता, रहस्यमय घटना वाचकाला दुसरा काही विचार करण्याची संधी देत नाही. 

सरदार सत्याश्रय महाराजांना जीर्ण कपड्यात गुंडाळलेलं दोन महिन्याचं बालक मिळाले. त्याचं नाव वीरधवल. त्यांनी व त्यांच्या पत्नीने या बालकाचे पालन पोषण केले. त्यांची मुले कुमार चंद्रसेन व ललितप्रभेसह सर्वप्रकारचे शिक्षण दिले. 

राजधानी राजमहेंद्री नगरीत सम्राट चंद्रकेतू महाराजांच्या मृत्यूनंतर सत्तालोभी गट परदेशी राजांशी संधान साधून राजतृष्णा पूर्ण करण्यासाठी कट कारस्थाने आखू लागतात त्यावेळी काही राजनिष्ठ सरदार आपले स्वप्ने पुरे होऊ देणार नाही हे ओळखून त्या राजनिष्ठ सरदारांवर खोटे दोषारोप करून कोणाला कारागृहात तर कोणाला राजधानीपासून दूर पाठवतात. 

सत्याश्रय महाराजांना सुद्धा राजधानीपासून शंभर कोस दूर जाण्यास सांगितले जाते. 

चंडवर्माचा अजिंक्यदुर्ग राजधानीपासून सव्वाशे कोस अंतरावर होता. चंडवर्म्याला अभिलाषा होती ती तारुण्यात पदार्पण केलेल्या ललितप्रभेची. आपल्या उपकाराने दबलेल्या सत्याश्रय महाराज तिचा विवाह आपल्याशी लावून देण्यास  विरोध करणार नाही या अपेक्षेने सरदार सत्याश्रयांना आपल्या अजिंक्यदूर्गावर राहण्यास बोलवतो. गेली अनेक वर्षे चंडवर्मा गडावर न राहता राजधानीत राहत होता. 

चंडवर्मा अजिंक्यदूर्गाच्या प्रवेशद्वारात असतांना शस्रागारातून  पुरातन लोह कवच पडून भयंकर ध्वनी निर्माण होतो.सगळे जण चरकतात. दुर्गरक्षकला अशुभाची चाहूल लागते. अजिंक्यदूर्गावर अगोदर किर्तीवर्म्याची सत्ता होती. पण दुर्दैवाने त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा खून होऊन अजिंक्यदूर्ग किर्तीवर्म्याचा धाकटा भाऊ चंडवर्माच्या ताब्यात आला होता. त्यानंतर जेव्हा जेव्हा शस्रागारातून लोहकवच पडल्याचा ध्वनी निर्माण झाला होता तेव्हा पुढच्या काही दिवसातच दुर्गावर वाईट घटना घडल्या होत्या. 

सत्याश्रय महाराज कुटुंबियांना घेऊन अजिंक्यदूर्गावर येतात. 
ललितप्रभा व वीरधवल यांच्यात बहिण भावापेक्षा वेगळे प्रेम  आहे याची जाणीव कुमार चंद्रसेनाला होते तेव्हा चंद्रसेन वीरधवलवर चिडतो. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची होते. त्यानंतर कुमार चंद्रसेन बेपत्ता होतो. त्याच्या खुनाचा आरोप ठेवून वीरधवल कारागृहात डांबला जातो. ललितप्रभेच्या विनवनीवरून चंडवर्मा वीरधवलला कारागृहातून पळून जाण्यास सांगतो. जंगलातून जातांना एक पिश्शाच्यकृती वीरधवलला परत अजिंक्यदूर्गावर जाण्यास सांगते. या अगोदरही हे पिशाच्च वीरधवलला दिसले होते. अपाय न करण्याची पिशाच्चाची भावना बघून वीरधवल परत दुर्गावर जातो तेव्हा उन्मतमणी, व दुर्जातमणी या दोन दरेडोखोरांची टोळी ललितप्रभेला पळवून नेत असताना दिसल्यावर वीरधवल लढा देऊन ललितप्रभेला वाचवतो. त्यात खूप जखमी होऊन बेशुद्ध पडतो. आपले बिंग फुटू नये म्हणून चंडवर्मा त्याला परत कारागृहात डांबतो. वीरधवलला आता चंडवर्म्यासह अजूनही शत्रू निर्माण झाले होते. 

जंगलात दिसलेल्या पिशाच्चाशिवाय वृद्ध वनचरीही वीरधवलला मदत करीत होती. तुझ्या मुळ स्थानी तुला पोहोचवणे हेच माझे जीवितकार्य आहे. तो पर्यंत मला मरता येणार नाही असेही ती वीरधवलला सांगते. 

आपण अनाथ असून आपले पालनपोषण सत्याश्रय महाराजांनी केले या ही पेक्षा आपले दुसरे काहीतरी जीवन रहस्य आहे आणि ते लवकरच समोर येईल असे त्याला वाटू लागले. 

अचानक पणे ज्याच्या खुनाच्या आरोपावरून वीरधवलला शिक्षा झाली होती तो कुमार चंद्रसेन परत येतो तेव्हा चंडवर्मा वीरधवलला अडकवण्यासाठी दुसरे कारस्थान रचू लागतो तर सत्याश्रय महाराजांच्या सांगण्यावरुन वीरधवल न्याय मागण्यासाठी राजधानीत जातो बाळ युवराजांना पळवून नेण्याऱ्या देषद्रोह्यांशी सामना करावा लागतो. एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तो दुसरे संकट उभे असते. जंगलात भेटलेली वृध्द वनचरी वीरधवलला होता होईल तितकी मदत करण्यासाठी राजधानीत येते. ती कोण आहे.. वीरधवलला मार्गदर्शन करणारे पिशाच्च कोणाचे... किर्तीवर्म्याचा खुनी कोण.. वगैरे सगळ्या रहस्यावरुन अगदी शेवटी पडदा हटतो आणि वीरधवल नेमका कोण याचे उत्तर मिळते, 

नाथमाधवांची ओघवत्या भाषाशैलीमुळे, आणि वेगळ्या विषय वैशिष्ट्यामुळे बहुपदरी रहस्यात अवगुंठलेले थरारक नाट्यमय दिर्घ कथानकात वाचकांना गुंतवून ठेवण्याचे अत्यंत अवघड शिवधनुष्य नाथमाधव अगदी सहजतेने पेलतात म्हणूनच शंभर वर्षांनंतरही वीरधवल आजही भुरळ पाडतो. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.