बाबुराव अर्नाळकर

बाबुराव अर्नाळकर: 


(९ जून १९०९ - ५ जुलै १९९६ ). 

लोकप्रिय मराठी गुप्तहेरकथाकार. चंद्रकांत सखाराम चव्हाण वास्तविक नाव.  एडगर वॉलिस ह्या इंग्रज लेखकाची द फोर जस्ट मेन ही कादंबरी अर्नाळकरांनी वाचली व सामान्य लोकांसाठी योग्य तो विषय त्यांस मिळाला. तो विषय म्हणजे गुप्तहेरकथा. तथापि चौकटची राणी ही त्यांची पहिली गुप्तहेरकथा  प्रसिद्ध झाली. 



त्यानंतर एक हजार पेक्षा जास्त गुप्तहेरकथा लिहून त्यांनी अमाप लोकप्रियता मिळविली. आपल्या गुप्तहेरकथांतून त्यांनी निर्माण केलेल्या धनंजय, छोटू, झुंजार, विजया, काळा पहाड, दर्यासारंग, चारुहास, दिलीपकुमार, भीमसेन, विलास, जयंत, भद्रंभद्र, कृष्णकुमारी इ. नायक-नायिकांनी
–‍ विशेषतः धनंजय, झुंजार आणि काळा पहाड यांनी –‍ अनेक मराठी वाचकांच्या मनाची पकड घेतली. 




गुप्तहेरकथांसारखा वेधक विषय आणि चित्तवेधक कथानक, उत्कंठावर्धक कथनशैली, ओघवती भाषा, आटोपशीर वर्णने आणि एकूण रचनेतील सुटसुटीतपणा इ. गुण यांमुळे सर्वसामान्य वाचकवर्गाचे ते आवडते लेखक ठरले. गिनीज बुक मध्ये नोंद झालेले बाबुराव अर्नाळकर हे मराठीमधील पहिले  लेखक म्हणावे लागतील.त्यांनी मराठी साहित्य जगतात आणलेल्या रहस्याच्या गारुडात अजूनही वाचक गुंतून आहेत. रहस्यकथा या साहित्यप्रकाराला एक प्रकारची प्रतिष्ठा अर्नाळकरांमुळे लाभली. तत्कालीन लोकप्रिय कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या कादंबर्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबर्‍या चोरून वाचल्या होत्या. 

( संकलीत)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.