स. ग. मालशे

सखाराम गंगाधर मालशे 



( २४ सप्टेंबर १९२१ - ७ जुन १९९२ )    

‘मराठी  संशोधन पत्रिका’, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’, ‘इये मराठीचिये नगरी’ अशा दर्जेदार संशोधनपर नियतकालिकांचे संपादक म्हणून त्यांनी अनेक दुर्मीळ ग्रंथांना व संशोधनपर लेखांना प्रसिद्धी दिली. त्यांचे हे कार्य मोलाचे ठरले.  या सर्वच लेखनांतून त्यांची ‘ना मूलं लिख्यते किंचित’ ही संशोधनातील निष्ठा पुरेपूर आढळते. कुणाचेही ‘नीट पण झूट’ लेखन त्यांनी कधी सहन केले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी कथा, ललितनिबंध, एकांकिका असे मोजके लेखन केले असले तरी समीक्षक आणि संशोधक म्हणूनच ते महत्त्वाचे लेखक ठरले. त्यांनी समीक्षा, संशोधन, संपादन, अनुवाद, बालसाहित्य, नाटक असे विविधांगी लेखन केले आहे. 




एकोणिसावे शतक हा त्यांच्या अभ्यासामधील आवडीचा भाग होता. या शतकाचा त्यांचा किती गाढा अभ्यास होता, हे त्यांनी या शतकातील जी पुस्तके संपादित केलेली आहेत आणि या पुस्तकांना ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्यांवरून लक्षात येते. त्यांतील काही पुस्तके अशी: ‘अव्वल इंग्रजीतील ग्रंथनिर्मितीची नांदी’, ‘दोन पुनर्विवाह प्रकरणे’ (१९७७), ‘शेट माधवदास रघुनाथदासकृत आत्मलिखित पुनर्विवाह चरित्र’ (१९८१), एकोणिसाव्या शतकासंबंधित आणखी दोन महत्त्वाची पुस्तके म्हणजे ‘विधवाविवाह चळवळ १८०० ते १९००’ (१९७८) आणि ‘गतशतक शोधिताना’ (१९८९).एकोणिसाव्या शतकाशी संबंधित सर्वच पुस्तकांमधून त्यांनी घेतलेला त्या शतकाचा वेध समग्र, परिपूर्ण आणि त्या शतकाची बारकाव्यानिशी ओळख करून देणारा आहे. ‘एकोणिसाव्या शतकाचा चालता-बोलता कोश’ असे त्यांचे वर्णन केले तर ते अतिशयोक्त ठरणार नाही. 

( संदर्भ - महाराष्ट्र नायक)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.