जोगांचा खरा परिचय साहित्यक्षेत्राला झाला तो त्यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ (१९३०) या ग्रंथामुळे होय. या ग्रंथात जोगांनी इंग्रजी साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले व अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य-विचाराला प्रदान केली. ‘
काव्यविभ्रम’ (१९५१) या ग्रंथातील अलंकारावरील त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रज्ञेचे द्योतक आहे. त्यांनी अलंकारांना काव्यशरीरावरील उपरे, बाह्यपदार्थ न मानता काव्यशरीरावरचे ते विभ्रम कसे आहेत, ते सप्रमाण पटवून दिले. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’ (१९५९) या त्यांच्या व्याख्यानमालेत त्यांनी सहाशे-सातशे वर्षांतील मराठी वाङ्मयाचे विहंगमावलोकन केले.
मराठी साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाचे तीन खंड त्यांनी संपादित केले . . ‘अर्वाचीन मराठी काव्य’ (१९४६), ‘केशवसुत काव्यदर्शन’ (१९४७), ‘चर्वणा’ (१९६०), ‘मराठी कविता’ (१९४५-१९६०), ‘दक्षिणा’ (१९६७), ‘विचक्षणा’ (१९६३), ‘समग्र माधव जूलियन’ (संपादन १९७७) हे त्यांचे इतर ग्रंथही महत्त्वाचे आहेत.१९६०सालच्या ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
( संदर्भ महाराष्ट्र नायक)