( १० फेब्रुवारी १८९० - ३० मे १९६०)
रशियाच्या एका संपूर्ण पिढीच्या मनावर आधिराज्य करणारा बोरिस लिओनीडोविच पास्तरनाक हा रशियन कवी, कादंबरीकार आणि कुशल अनुवादक १८९० साली मॉस्कोत जन्मला. बोरिसच्या वडिलांकडे कलाकार, कवी, संगीतज्ञांचे नेहमी येणे-जाणे असे. शैक्षणिक काळात सहा वष्रे संगीत शिकतानाच त्याने लेखन आणि काव्य करण्यास सुरुवात केली. ‘माय सिस्टर लाइफ’ हा त्याचा रशियन भाषेतला पहिला काव्यसंग्रह, आजही प्रभावी काव्य म्हणून ओळखला जातो.
बोरिस पास्तरनाकचं नाव वाङ्मयाच्या इतिहासात अजरामर झालं ते त्याच्या ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीमुळे. १९०५ आणि १९१७ साली झालेल्या रशियन राज्यक्रांत्यांच्या दरम्यानच्या काळातलं आणि तसंच पहिल्या महायुद्ध काळातल्या रशियन सामाजिक परिस्थितीचं उत्तम चित्रण डॉ. झिवागोत मिळतं. रशियात १९१७ साली घडलेल्या कम्युनिस्ट क्रांतीने रशियन समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ झाली. डॉ. झिवागोखेरीज बोरिसच्या ‘थिम्स अॅण्ड व्हेरिएशन्स’, ‘द इयर १९०५’, ‘द सेकंड बर्थ’ इत्यादी काव्यसंग्रहातही क्रांतिकाळातल्या परिस्थितीच्या मनोवेधी वर्णनामुळे बोरिस पास्तरनाकचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं! पास्तरनाकचे समाजवादावरील स्वतंत्र विचार सोव्हिएत सरकारला न पटल्याने त्यांनी डॉ. झिवागोच्या प्रकाशनावर बंदी घातली. या कादंबरीचे हस्तलिखित इटलीतील मिलान येथे गुप्तपणे आणून १९५७ मध्ये डॉ. झिवागोचे प्रकाशन मिलानमध्ये करण्यात आले. जगप्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला १९५८ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. त्यामुळे संतापलेल्या सोव्हिएत कम्युनिस्ट सरकारने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक घेण्यास जाण्यावरही बंदी घातली. अखेर १९८८ मध्ये पास्तरनाकच्या पुढच्या वंशजांनी ते नोबेल पारितोषिक स्वीकारले. सोव्हिएत सरकारच्या बंधनांमुळे आणि गळचेपीमुळे बोरिसने २० वष्रे आपली कोणतीही स्वतंत्र साहित्यकृती प्रकाशित न करता गटे आणि शेक्सपियरच्या साहित्याचा रशियन भाषेत अनुवाद करण्याचे काम केले.
( संकलीत)