लेखक - गिरीश कुबेर
प्रकाशक - राजहंस प्रकाशन
दोन शतकांपूर्वी चीन पाश्चात्यांपेक्षा कितीतरी समृद्ध होता. महामार्गाचं जाळं, प्रचंड कालव्याद्वारे जलवाहतूक करण्याइतका अधुनिक विचार, अभियांत्रिकी कौशल्य अशी कारणं त्यामागे होती. १८२० च्या नोंदीनुसार जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा तब्बल तीस टक्के होता. पुर्व पश्चिम युरोप आणि समग्र अमेरिकेपेक्षा हे प्रमाण जास्त होतं.
औद्योगिक क्रांतीमुळे हे चित्र बदललं. अफू या एका अंमली पदार्थासाठी इंग्रजांनी लादलेल्या युध्दामुळे चीनच्या अधोगतीला सुरुवात झाली. युरोपियन नामोहरम करीत असतांना रशियाही लचके तोडत होता, जपान सुध्दा डोळे दाखवत होता. तैवान, कोरियाचा काही भूभाग सोडावा लागला. अठराव्या शतकाची अखेर व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला चिनी राजसत्ता खिळखिळी झाली होती. माओ आल्यावर काही स्थिरता आली. राजेशाही संपली, पण हुकूमशही संपत नव्हती. संपलीही नाही.
एकच शतकात तीन-तीन क्रांती अनुभवलेला चीन सारखा दुसरा देश नसेल. पहिली क्रांती म्हणजे क्विंग घराण्याची राजवट संपुष्टात येणे, ही घटना १९१२ सालची, १९४९ साली माओ सत्तेत आला आणि सुरू झाला एक जीव घेणा नृशंस कार्यकाल ही दुसरी क्रांती. माओ नतर डेंग शियाओपिंग यांनी तिसरी क्रांती घडवून आणली. तेव्हा आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली. लोकशाहीची स्वप्ने दाखवीत सत्तेवरची पकड घट्ट करीत राहिले. पुढे हु जिंताव यांनी आपल्या देशात महासत्ता पदाच्या उंबरठ्यापर्यंत आणून ठेवलं.
या काळात चीनने जगाच्या अशा आकांक्षा कमालीच्या वाढवल्या. लोकशाही नांदू शकेल असा विश्वास निर्माण केला, आणि या भावनेचा पुरेपूर दुरुपयोग करून चीनचं रुपांतर एका जगड्व्याळ क्रूर आणि शून्य विश्वासार्हता असणाऱ्या एकाधिकारशाहीत करून ठेवलं. हा प्रवास लोकशाहीची स्वप्न दाखवणारे पाहता पाहता कसे हुकूमशाळा होतात हे दाखवणारा नाट्यपूर्ण आणि अभूतपूर्व असा आहे.
जगभरातील उद्योजकांना आमंत्रित करतांना तंत्रज्ञान तुमचं, कामगार आमचे आणि तुमचं उत्पादन आमच्या देशात विकायचं नाही या अटी टाकून यंत्रणा जास्तीत जास्त उद्योग स्नेही करून दिली. त्याच सोबत चिनी तंत्रज्ञांनी उत्पादनाच्या आराखड्यांची कॉपी करून जगभरात स्वस्तात देऊन निर्यात वाढवून डॉलर गोळा केले. आणि त्याच डाॅलरच्या जोरावर आता भल्या भल्यांना डोळे दाखवतात.
देशातल्या एस इ झेड मध्ये जगातील अत्यंत स्वस्तातील स्वस्त सेवा देऊन जिनपिंग यांनी बाजारपेठेची नाडी आपल्याच हातात राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. दुसरीकडे त्याच वेळी त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नव्या उद्योगांच्या चिनी आवृत्त विकसित होतील याची काळजी घेतलेली आहे
ट्विटर ( एक्स) ,फेसबुक ,व्हाट्सअप, युट्युब या समाजमाध्यमांना बंदी घालून देशातील जनतेला चिनी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
चीनमधील बहुतांश सगळी ॲप ही देशी बनावटीचे आहेत. आपापली काम करता करता फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाने नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी त्याचा सहज वापर होतो. आज चीन मधल्या बहुतांश शहरांमधला एकही कोपरा असा नसेल की नागरिकांवर नजर ठेवता येत नाही. चीनचे वर्णन एक सर्वेलन्स स्टेट असं केलं जातं ते यामुळेच.
क्षि जिनपिंग याच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष दोन टर्म सत्ता उपभोगून बाजूला झाले मात्र क्षि जिनपिंग यांनी घटना दुरुस्ती करून तहहयात अध्यक्षपदी राहण्याची सोय करून घेतली.
कोणतीही गुंतागुंतीची गोष्ट सोपी करून सांगण्याच्या हातोटीने
गिरीश कुबेर यांनी चीनची अगदी सरळ साध्या सोप्या भाषाशैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे. समाजवादी आवरणाखाली दडलेल्या भांडवलशाहीवादी हुकूमशाहीचे हे अक्राळविक्राळ स्वरूप जगाला आचंबित करणारं आहे.