राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी 



(२६मे १८८५–२३ जानेवारी १९१९). 

एक श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी. कवितालेखन ‘गोविंदग्रज’ ह्या नावाने. विनोद लेखन ‘बाळकराम’ ह्या नावाने. पुण्याच्या ज्ञानप्रकाशात काही काळ उपसंपादकाची नोकरी केली. तसेच पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाचे काम केले. १९१० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीशी नाटकासाठी पदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा संबंध आला. त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखानावरच आपला चरितार्थ चालविला. प्रेमसंन्यास (१९१३) हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. 



त्यानंतरची त्यांची नाटके अशी : पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला  (१९१९), भावबंधन (१९२०) व राजसंन्यास (१९२२, अपूर्ण). वाग्वैजयंती (१९२१). त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम (१९२५) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. ह्यांशिवाय गडकऱ्यांचे बराच काळ अप्रकाशित राहिलेले साहित्य अप्रकाशित गडकरी (१९६२) ह्या नावाने प्रल्हाद केशव अत्रे ह्यांनी संपादित केले आहे. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतींतून नाट्यात्मतेबरोबर ठिकठिकाणी काव्यात्मतेचा साक्षात्कार होतो आणि त्यांचे विनोदी लेखन उपहासापेक्षा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आढळते. 



असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्‌मयाचे विशेष आहेत. करूण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिति त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. . एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम भावबंधनातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा प्रेमसंन्यासमधील गोकुळ पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ह्या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत. 


( संदर्भ - मराठी विश्वकोश)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.