(३ जुलै १९१४ – ५ जानेवारी १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, इतिहाससंशोधक, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, कलामीमांसक, समीक्षक, नाटककार.कलात्मक आविष्काराच्या स्वरूपाचा शोध घेणाऱ्या कलाविचाराची मांडणी पोत , शक्तिसौष्ठव , गतिमानी , लोकधाटी , मातावळ , ऊर्जायन, वाssकविचार या पुस्तकांतून केली आहे.
कलाविष्काराची मूळ कथावस्तू एकच असली तरी, भिन्न काळी, भिन्न स्थळी, भिन्न माध्यमांत तिचे जे आविष्कार घडतात त्या आविष्कारांच्या पोतांत समकालीन जीवनजाणीव प्रत्ययाला येते. या निरीक्षणांच्या आधारे गोडसे यांनी ‘कलात्मक आविष्कारांतून जीवनदर्शन होते आणि ते अपरिहार्यपणे स्थितिसापेक्ष असते,’ हा सिद्धान्त मांडून कलात्मक आविष्काराचा समाजजीवनाशी संबंध जोडला आहे. शिवकालीन आविष्कार हे गोडसे यांच्या दृष्टीने कलात्मक आविष्कार आहेत. या आविष्कारांचे सौष्ठव घडवणाऱ्या शैलीला गोडसे ‘शक्तिसौष्ठवशैली’ असे म्हणतात.
समन्दे तलाश (१९८५) व दफ्तनी (१९९२) हे गोडसे यांचे इतिहाससंशोधनात्मक लेखांचे संग्रह होत. नांगी असलेले फुलपाखरू (१९८९) या पुस्तकातील लेखांतून चित्रकला, साहित्य, नाटक, इतिहास अशा विविध विषयांवरील त्यांचे विचार आढळतात. बाजीरावाची प्रेयसी असलेल्या मस्तानीकडे पूर्वग्रहविरहित दृष्टीने पाहिले जात नाही, या पार्श्वभूमीवर मस्तानीचे वास्तव शोधण्याचा प्रयत्न गोडसे यांनी मस्तानी (१९८९) या पुस्तकाद्वारे केला आहे. कैकयीची व्यथा प्रकट करणारे धाडि याला राम तिने का वनी हे कालिदासकृत शाकुंतल चे स्वैर मराठी रूपांतर असून पौराणिक कथेचा वेगळा अविष्कार सादर करणारे नाटकही त्यांनी लिहिले गोडसे रंगमंचावरील वास्तवपूर्ण नेपथ्याबरोबरच भरत नाट्यप्रणीत त्रिस्तरीय नेपथ्याचे मराठी रंगभूमीवरील आद्य निर्माते मानले जातात.त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार. (पोत, १९६४), (शक्तिसौष्ठव,१९७२), (गतिमानी, १९७६), (समन्दे तलाश, १९८६),सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून नाट्यदर्पण मानचिन्ह त्यांना बॅरिस्टर (१९७८) आणि बावनखणी (१९८४) या नाटकांसाठी प्राप्त झाले आहे.
( संदर्भ मराठी विश्वकोश, सरोज पाटणकर)