लेखक - डॅन ब्राऊन
अनुवाद - अशोक पाध्ये
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस
य कादंबरीमध्ये महा संगणकाचे विश्व आहे. कोणीही कुठेही पाठवलेल्या गुप्त किंवा सांकेतिक लिपीतील मजकुराची उकल एक महासंगणक करतो, यामुळे परकीय हेरांचे संदेश, गुन्हेगारांचे निरोप या समाजविरोधी व राष्ट्रविरोधी लोकांच्या गोपनीयतेचा भेद करून अमेरिकी सरकार त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत असते त्यासाठी एक वेगळी संस्था काम करीत असते.
नॅशनल सिक्युरिटी एजन्सी अर्थात एन एस ए ही जगातील सर्वात मोठी व गुप्तपणे माहिती गोळा करणारी संस्था होती. अमेरिकी सरकारच्या संपर्काला संरक्षण देणे आणि परकीय सत्तांच्या संपर्काचा भेद करून त्यातील माहिती मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. एफ बी आय, सी आय ए या हेर संस्था, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे सल्लागार हे सर्व एनएसए कडून आलेल्या माहितीवर अवलंबून असत नंतरच ते आपले निर्णय घेत.
तंत्रज्ञान जसजसे बदलत गेले तसतशा एन एस ए समोरच्या अडचणी वाढत गेल्या. लष्करी उपयोगापुरते असलेले इंटरनेट सर्वसामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध झाल्यावर एन एस ए समोर मोठे आव्हान उभे राहिले. प्रगत तंत्रज्ञानामुळे संगणाचे पासवर्ड जटील बनू लागले. मग एन एस ए ने कोणत्याही गुप्त सांकेतिक मजकूर चा गुढ उकलणारे यंत्र बनवायचे ठरवले आणि अफाट पैसा खर्च करून महासंगणक ट्रान्सलेटर बनवला. जो कोणत्याही सांकेतिक लिपीतील मजकूराची उकल करू शकत होता. याचं श्रेय जात होतं एन एस ए चा डेप्युटी डायरेक्टर स्ट्राॅथमोर ला. एन एस ए व अमेरिकन सरकारने सार्वजनिक रित्या असा महासंगणक ट्रान्सलेटर बनवलाय हेच नाकारलेलं होतं. जेव्हा एन एस ए एखाद्या पेचात पडे, किंवा तो पेच सोडवतांना कोणतीही नितीमत्ता आड येई तेव्हा स्ट्राॅथमोर कठोर निर्णय घेऊन पेचातून एन एस ए ला मोकळं करायचा. अत्यंत कठीण परिस्थितीत ही शांत डोक्याने निर्णय घेणारा म्हणून त्याची ख्याती होती.
एन्झाईम्स टंकोडा जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे विकृती घेऊन जन्माला आला. त्याचा जन्म होताच आई गेली. त्याचं विकृत शरीर बघून बापाने नाकारलेला, अनाथाश्रमात वाढलेला किशोर वयात संगणकाशी दोस्ती केलेला. संगणक क्षेत्रात अपंग बुध्दीवान म्हणून जगात ओळखला जाऊ लागल्यावर एन एस ए ने त्याला आपल्यात सामावून घेतलं महासंगणक ट्रान्सलेटर मध्ये संदेशाची उकल करण्याअगोदर न्यायालयाची परवानगी घेतली जाईल असे त्याला वाटले पण स्ट्राॅथमोरने हुशारीने ही मागणी धुडकावून लावली. टंकोडाच्या मते यामुळे नागरी हक्कांवर गदा येते. एन एस ए मधून बाहेर पडून त्याने एक संगणकीय प्रणाली बनवली. त्या प्रणालीचं नाव 'डिजिटल फोर्ट्रेस, 'कोणताही संकेत, गुप्तता, पासवर्ड याचा भेद करू न शकणारं डिजिटल फोर्ट्रेस हे गुप्तहेर जगातील एक जबरदस्त शस्त्र ठरणार होते. त्याच्यासमोर महासंगणक ट्रांसलेटर निष्प्रभ होणार होता. स्ट्राॅथमोर असं काही होऊ देणार नव्हता. मदतीसाठी त्याने एन एस ए तील क्रिप्टाॅलाॅजी विभागाची प्रमुख सुसान ची मदत घेतली.
डिजिटल फोर्ट्रेस टंकोडाने इंटरनेटवर विक्रीसाठी ठेवला. कोणीही तो डाऊनलोड करू शकत होतं. पण तो चालू करण्यासाठीचा पासवर्ड फक्त टंकोडाकडे होता. लिलावात त्या पासवर्ड साठी करोडोची बोली लागली होती.
अशातच स्पेनमध्ये टंकोडा हार्टअटॅक ने मृत्यू मुखी पडल्याची बातमी स्ट्राॅथमोरला समजली. सरकारी यंत्रणेद्वारे तो टंकोडाच्या सगळ्या वस्तू ताब्यात घेऊ शकला असता पण यासाठी त्याने सुसानचा होणारा पती डेव्हिड बेकरला स्पेनमध्ये पाठवलं. कारण जर इतर कोणीही टंकोडावर लक्ष ठेवून असेल तर डेव्हिड सारखा महाविद्यालयात परकीय भाषा प्रमूख असलेल्या प्रोफेसर कोणाच्या लक्षात आला नसता.
स्पेनमध्ये गेल्यावर डेव्हिड ला समजले की टंकोडाच्या हाताच्या बोटातली आंगठी मरण्यापूर्वी त्याने कोणाला तरी दिली. त्या आंगठीवर काही अक्षरे कोरलेली होती. डेव्हिड च्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले. पण सुसानच्या बाॅसला कसे नाराज करणार हा विचार करून डेव्हिड शोध घेण्याच्या तयारीला लागला. तो एक प्रोफेसर होता. हे काम कसं करायचं याची त्याला काहीच माहिती नव्हती.
इथून सुरू होतो जीवघेणा थरार. टंकोडाच्या भागीदाराकडेही डिजिटल फोर्ट्रेस चा पासवर्ड आहे. तो शोधण्यासाठी स्ट्राॅथमोर सुटीच्या दिवशी सुसानला ऑफीसमध्ये बोलवतो. टंकोडाच्या भागीदाराचा इंटरनेटने काही मागोवा लागतो का हे बघण्यासाठी ती क्रिप्टाॅलाॅजी विभागात येते तर तिथे अगोदरच साॅफ्टवेअर इंजिनिअर हेल बसलेला असतो. दुसरा एक तंत्रज्ञ गोंधळलेल्या घाबरलेल्या अवस्थेत येऊन स्ट्राॅथमोर ला सांगतो की महासंगणक ट्रान्सलेटर गेल्या सोळा तासापासून एकाच फाईलवर काम करतोय म्हणजे त्यात व्हायरस शिरला असावा. स्ट्राॅथमोर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो ऐकायला तयार नाही हे बघून त्याला जायला सांगतो.
थोड्या वेळाने तळघरातील जनरेटरवर त्याचा मृतदेह सुसानला दिसतो. अंधारात लपलेला हेल दिसतो. तळघरातल्या पायऱ्यांवर स्ट्राॅथमोर वाकून खाली बघत असतो. त्या तंत्रज्ञाला कोणी मारले हा प्रश्न सुसानला घाबरवतो. तिला डेव्हिडची काळजी वाटायला लागते. तो टंकोडाची आंगठी मिळवण्यासाठी धोकादायक परिस्थितीत अडकून जातो.
पुढे मती गुंग करणाऱ्या घटना वेगाने घडत राहतात. आणि वाचक गुरफटत जातो. महासंगणक ट्रान्सलेटर ची भव्य व्याप्ती, त्याच्या साठी उभारलेले अजस्त्र यंत्रणेचं भितीदायक वर्णन अंगावर काटा आणतं. तिथे असलेली प्रत्येक व्यक्ती स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असते तर स्ट्राॅथमोर महासंगणक ट्रान्सलेटर वाचवण्याच्या नादात धोका पत्करतो. जर त्याने तो धोका पत्करला नाही तर अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा उघड्यावर येणार होती.
प्रत्येक पानावर थरार उभा करणारी अत्यंत रहस्यमय वाचनीय कादंबरी.