( १ जुलै १८८७ - २२ नोव्हेंबर १९२०)
मराठी कवी. आपल्या आरंभीच्या कविता रेंदाळकरांनी ‘मंदार’ ह्या टोपण नावाने लिहिल्या. मंदारमञ्जरी ह्या काव्यसंग्रहात त्या समाविष्ट आहेत. मोहिनी (खंडकाव्य), अन्योक्तिमुक्तांजंलि (दोन भाग), विरहिणी राधा, आणि बुध्दीनीति ह्या त्यांच्या अन्य काही काव्यकृती. रेंदाळकरांची कविता (दोन भाग) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. रेंदाळकरांची स्फुट काव्यरचना तीनशेवर असून त्याशिवाय ‘यमुना गीत’, ‘मोहिनी’, ‘सारजा’ सारखी त्यांची दीर्घ काव्यरचनाही पुष्कळच आहे.
रेंदाळकरांनी स्वतःला केशवसुतांचे निष्ठांवत अनुयायी मानले. संस्कृतप्रचुर, प्रौढ, प्रसादपूर्ण आणि सहज अशी त्यांची काव्यरचना आहे. तथापि ह्या काव्यरचनेपैकी फारच थोडी वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. अशरीर (प्लेटॉनिक) प्रेमाचा आपल्या काव्यातून त्यांनी पुरस्कार केला आणि हे त्यांचे आशयदृष्ट्या वैशिष्ट्ये होते.रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत बंगाली, क्वचित गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
(संदर्भ - विश्वकोश, रा श्री जोग)