( ९ ऑगस्ट १९२० - ३० जुन १९९९ )
यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या सार्यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता.
अपुर्या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे-जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक भावमधुर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भाव-भावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.
‘घाल घाल पिंगा वार्या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते. लोकान्तापेक्षा एकान्तात रमणारा काव्यप्रेमी, स्वप्नाळू, सौंदर्यासक्त कवी म्हणून निकुम्ब ओळखले जातात. अनेक संतकवींच्या, आधुनिक कवींच्या काव्याची आस्वादक समीक्षा करून त्यांनी या काव्यांचे मोठेपण रसिकांना जाणवून दिले आहे.
‘अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे, म्हणजे उंबराला फूल येणे’ अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देते.( संदर्भ - महाराष्ट्र नायक,डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर)